बाबासो हळिज्वाळेकोगनोळी : कर्नाटकात प्रवेश करायचा असेल तर कोरोना निगेटीव्ह प्रमाणपत्र किंवा कोरोना लसीचा एक डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले होते. परंतु शनिवार दिनांक 31 पासून कर्नाटकात प्रवेशासाठीचे कोरोना लसीचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र असेल तरच राज्यात प्रवेश देण्यात येत आहे. यावरून कोरोनाच्या परिस्थितीनुसार कर्नाटक शासन निर्बंधांमध्ये बदल करत असल्याचे दिसून येत आहे.आपल्या शेजारील राज्यातील कोरोनाचा संसर्ग आपल्या राज्यात होऊ नये यासाठी कर्नाटक शासन सुरुवातीपासूनच दक्ष असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे त्यांनी वारंवार परिस्थितीनुसार प्रवाशांवर निर्बंध लादले होते. कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र किंवा कोरोना लसीचा पहिला डोस असेल तरच राज्यात प्रवेश तसेच या दोन्ही गोष्टी नसतील तर राज्यातील प्रवेशास मज्जाव करण्यात येत होता.
अति महत्त्वाचे कारण असल्यास कर्नाटक महाराष्ट्र आंतरराज्य सीमा असणाऱ्या कोगनोळी येथील तपासणी पथकाच्या ठिकाणी प्रवाशांची रॅपिड टेस्ट करण्यात येत होती. ती निगेटिव्ह आली तरच राज्यात प्रवेश देण्यात येत होता. या निर्बंधांमध्ये मंगळवार दिनांक 31 पासून बदल करण्यात आले आहेत. यामध्ये फक्त कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र असेल तरच राज्यात प्रवेश देण्यात येत आहे.कर्नाटक शासनाने या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे वाहनधारकांची मात्र तारांबळ उडाली आहे. त्यामुळे कोगनोळी येथील तपासणी नाक्यावर जवळपास एक ते दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
या ठिकाणी तहसीलदार डॉ. मोहन भस्मे, अन्न निरिक्षक आनंदा मडिवाळ, मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, निपाणी ग्रामीण स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक अनिल कुंभार, कित्तूरचे उपनिरिक्षक देवराज उळागड्डी, हुक्केरीचे उपनिरिक्षक सिद्धरामप्पा हुन्नद आदींच्यासह अनेक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.पोलीस-प्रवासी यांच्यात वादकर्नाटक शासनाने या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे अनेक प्रवाशांची तारांबळ उडाली आहे सोबत असलेले लस घेतलेले प्रमाणपत्र असूनही पुढे सोडत नसल्याने प्रवासी व पोलीस प्रशासन यांच्यात वाद होत होते. पोलीस प्रशासन प्रवाशांना कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आल्याचे सांगत होते.