कोल्हापूर : येथील बालकल्याण संकुलातील मुलांना कोरोनाची बाधा झाल्याने संस्थेतील सर्व ८४ कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी युद्धपातळीवर यंत्रणा राबवून सोमवारी लसीकरण केले. कोरोनाबाधित झालेली ४७ मुले व सहा कर्मचारी विद्यापीठातील कोविड केंद्रात असून त्यांची प्रकृती चांगली आहे. दहा दिवसांनंतर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे.
संकुलातील मुलांना संसर्ग झाल्याने जिल्हा प्रशासनही हादरले. कारण जिल्हाधिकारी हेच संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांनी लक्ष घालून अन्य मुलांना संसर्ग होऊ नये यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मदतीने सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घेण्यात आले. कोरोनाबाधित असलेली मुले कोविड केंद्रात विलगीकरणात आहेत. त्यांना बैठ्या खेळाचे साहित्य पुरवण्यात आले आहे. काही मुले उत्तम चित्रे काढत आहेत. संस्थेचे दोन कर्मचारी व मानद कार्यवाह पद्मा तिवले या रोज तिथे जावून मुलांची मायेने देखभाल पाहतात. त्यांच्या आहाराकडेही लक्ष दिले जाते. महापालिका यंत्रणेचेही फारच चांगले सहकार्य लाभल्याचे तिवले यांनी सांगितले.