कोल्हापूर : कोविड लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याचे शासनाने जाहीर केले आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात या वयोगटातील नागरिकांसाठी आज, शनिवारपासून प्रायोगिक तत्त्वावर दि. ७ मेपर्यंत लसीकरणाची मोहीम राबविण्यात येणार आहे.
कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनाअंतर्गत महत्त्वाकांक्षी कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामधील या तिसऱ्या टप्प्यातील प्रायोगिक तत्त्वावरील लसीकरण शनिवारपासून सुरू होईल. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय शिरोळ, वसाहत रुग्णालय गांधीनगर, ग्रामीण रुग्णालय कागल, प्राथमिक आरोग्य केंद्र भेडसगाव (ता. शाहूवाडी), भगवान महावीर दवाखाना विक्रमनगर (कोल्हापूर शहर) याठिकाणी लसीकरण केले जाणार आहे. ऑनलाइन नोंदणी आणि भेट निश्चित नसल्यास नागरिकांनी लस दिली जाणार नाही. त्यामुळे अशा नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी शुक्रवारी दिली.
चौकट
लसीकरणासाठी हे महत्त्वाचे
लसीकरणासाठी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी केंद्रशासनाच्या कोविन पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करावी. ऑनलाइन भेट निश्चित (तारीख, वेळ) झाल्यावर निवडलेल्या लसीकरण केंद्रावर वेळेत उपस्थित राहावे. त्यांनी केंद्रात येताना आधार कार्ड, छायाचित्र (फोटो आयडी) असलेले कोणतेही ओळखपत्र घेऊन यावे. ऑनलाइन नोंदणी करताना नागरिकांनी १८ ते ४४ या वयोगटांची निवड करावी. ही ऑनलाइन नोंदणी रोज दोनशे लाभार्थी अशी मर्यादित स्वरूपाची आहे, अशी माहिती डॉ. साळे यांनी दिली.
चौकट
वारंवार नोंदणी करायला लागू नये
लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी केली आणि त्यासाठी लस उपलब्ध नसल्यास पुन्हा नोंदणी करण्यास सांगितले जात असून ते त्रासदायक आहे. पुन्हा नोंदणी केली आणि त्यादिवशीही लस नसल्यास पुन्हा नोंदणी करणे हा भोंगळ कारभार आहे. त्यामुळे लसीकरणासाठी वारंवार नोंदणी करायला लागू नये. पहिल्यांदा नोंदणी केलेल्या क्रमाकांनुसार लस दिली पाहिजे, अशी मागणी आयटक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष दिलीप पवार यांनी केली.