कोल्हापूर : कोरोना लसीकरणाविषयी मनामध्ये असलेले किंतू-परंतु यांना दूर सारत काेल्हापूरकरांनी मतदानाला लागतात त्याप्रमाणे रांगा लावून सार्वत्रिक लसीकरणाच्या पहिल्या दिवशी सक्तीने नव्हे तर स्वेच्छेने लस टोचून घेतली. जिल्ह्यातील ३५० केंद्रांवर २० हजार जणांनी पहिल्या दिवशी लस टोचून घेतली.
देशभरात गुरुवारपासून ४५ वर्षांवरील सर्वच नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाल्यानंतर कोल्हापुरात याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याआधी १३० केंद्रांवर लस दिली जात होती. सरसकट लसीकरण सुरू झाल्याने आणखी २२० केंद्रे नव्याने कार्यान्वित करण्यात आली. एकूण ३५० केंद्रांवर अतिशय उत्साहाने भारलेल्या वातावरण लसीकरण झाले.
जिल्ह्यात ११ लाख ४७ हजार नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवून यंत्रणा कामास लागली आहे. दुपारी उन्हाचा कडाका जास्त असल्याने सकाळी आणि संध्याकाळी लसीकरण केंद्रावर गर्दी झाली होती. लसीचा कुठेही तुटवडा जाणवला नाही, अथवा लस टोचल्यानंतर कुणाला रिॲक्शन आल्याची घटना घडली नाही. उत्तम प्रतिसादात सुरळीतपणे लसीकरण झाले.
जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे यांच्यासह शहरातील सर्व सरकारी दवाखान्यांमध्ये लसीकरणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. लसीकरण केंद्राच्याबाहेर उन्हापासून संरक्षणासाठी मांडवही घालण्यात आले होते. येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी बैठक व्यवस्था, लस घेतल्यानंतर अर्धा तासासाठी विश्रांती कक्षाचीही सोय केली होती. आरोग्य सेवक, आशा कर्मचारी यांच्या मदतीने ही लसीकरणाची प्रक्रीया राबवण्यात येत होती.
चौकट ०१
कोरोनाचे लसीकरण घेताना मात्र सोशल डिस्टन्सच्या नियमाचा फज्जा उडाल्याचे चित्रही बऱ्याच केंद्रांवर दिसत होते. सकाळी एकाच वेळी गर्दी झाल्याने केंद्रे हाऊसफुल्ल झाली होती. गर्दीतून वाट काढतच रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण केली जात होती.
चौकट ०२
अशी आहे प्रक्रिया
लसीकरणासाठी येताना सोबत आधार कार्डची आवश्यकता आहे. केंद्रावर आल्यावर प्रथम रजिस्ट्रेशन करुन घेतले जाते. कॉम्युटरमध्ये नाेंद झाल्यानंतर नंबराप्रमाणे लस घेण्यासाठी बोलावले जाते. जेवून आला आहात का, दुसरा कोणता आजार आहे का याची विचारणा होते. लस टोचल्यानंतर विश्रांती कक्षात बसवले जाते. कोणताही त्रास जाणवू नये म्हणून गोळ्याही दिल्या जातात.
फोटो: ०१०३२०२१-कोल-लसीकरण कोल्हापूर
फोटो ओळ : राज्य शासनाच्यावतीने ४५ वर्षांवरील नागरिकांची कोरोना लसीकरणाची मोहीम गुरुवारपासून सुरु झाली. पहिल्याच दिवशी कोल्हापूरकरांनी रांगा लावून लस टोचून घेतली. कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात अशी गर्दी दिसत होती. (छाया: नसीर अत्तार)