कोल्हापूर : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील ६० वर्षांवरील नागरिकांसाठी १ ऑक्टोबरपासून कोरोना विशेष लसीकरण सत्राचे आयोजन केल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी गुरुवारी दिली. ‘लोकमत’ने गुरुवारीच लसीकरणाकडे विशेष लक्ष दिले जात नसल्याचे वृत्त दिले होते.
जिल्ह्यात ६० वर्षांवरील ८२ टक्के नागरिकांचा पहिला डोस तर ६० टक्के लोकांचा दुसरा डोस झाला आहे. जिल्ह्यात ५ लाख ६९ हजार २९५ इतके अपेक्षित लाभार्थी आहेत. जिल्ह्यात अजूनही एकही डोस न घेतलेल्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या ६९ हजार २६३ आहे. ज्येष्ठ नागरिकांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी म्हणून ज्येष्ठ नागरिक दिन जगभर साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून जिल्हा प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठीचे नियोजन केले आहे. त्याचा फायदा या नागरिकांना नक्कीच होणार आहे.
तालुकानिहाय लसीकरण होणाऱ्या ज्येष्ठांची संख्या :
हातकणंगले - २२२३३,
करवीर-८२०२,
शिरोळ- ७६५३,
कोल्हापूर मनपा : ७३७४,
चंदगड-५७८०,
राधानगरी-३८७२,
पन्हाळा-३७०५,
गडहिंग्लज-३११५,
कागल-२९१४,
भुदरगड-२४९५,
आजरा-१२०६,
गगनबावडा-५७९,
शाहूवाडी-१३५