कोल्हापूर : शहरातील लसीकरण केंद्रावर सकाळच्यावेळी गर्दी झाल्याने सामाजिक अंतराच्या नियमाचा फज्जा उडाला. अनेकदा हेलपाटे मारूनही लस मिळाले नसल्याने अनेकजण केंद्रावर आरोग्य प्रशासनाशी वाद घालताना दिसत होते. सर्वच केंद्रांवर गर्दी झाल्याने सामाजिक अंतर राखून सुरळीतपणे लसीकरणाची प्रक्रिया राबवण्यात आरोग्य प्रशासन हलबल बनले. दरम्यान, सोमवारी दिवसभर १५१५ जणांना लस देण्यात आली. पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध नसल्याने आज मंगळवारी महापालिकेच्या सर्व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रावरील लसीकरण बंद राहणार आहे, असे महापालिका प्रशासनातर्फे कळवण्यात आले आहे.
सीपीआर रुग्णालय, सेवा रुग्णालय, महापालिकेच्या ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांत कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. येथे मागणी इतका लस पुरवठा होत नसल्याने आलेल्या सर्वांना लस देण्यात आरोग्य यंत्रणा अपयशी ठरत आहे. यामुळे लस मिळेल की नाही, या भावनेतून गर्दी होत आहेत. अनेक जणांना हेलपाटा मारावा लागत आहे. यामध्ये ६० वर्षांवरील अनेक ज्येष्ठही आहेत. विविध वयोगटासाठी एकाचवेळी लसीकरण सुरू असल्याने सर्वच केंद्रांवर गर्दी होत आहे. सेवा रुग्णालय, सावित्रीबाई फुले, सीपीआरमध्ये गर्दी अधिक राहिल्याने वादावादीचे प्रकार घडले. रांग लांब लागल्याने गोंधळाची स्थिती राहिली. सीपीआर रुग्णालय वगळता इतर ठिकाणची बहुतांशी आरोग्य यंत्रणा लसीकरणात गुंतल्याने बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णालयांना चांगली सेवा देण्यात मर्यादा आल्या.
सीपीआर रुग्णालयात ६० वर्षांवरील ९६ जणांना कोविशिल्डचा पहिला डोस तर, ४५ वर्षांवरील १४१९ जणांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात आला. सावित्रीबाई फुले येथे ८२, फिरंगाई येथे १२३, राजारामपुरी येथे १०५, पंचगंगा येथे ११४, कसबा बावडा येथे १००, महाडिक माळ येथे १३९, आयसोलेशनमध्ये ७८, फुलेवाडीत २०५, सदर बाजारमध्ये १५९, सिद्धार्थनगरमध्ये १००, मोरे मानेनगर येथे ११०, सीपीआर रुग्णालयात ६० वर्षांच्या आतील २०० जणांना लसीकरण करण्यात आले. शहरात आजअखेर १ लाख २५ हजार ४१० जणांना पहिल्या डोसचे तर, ५१ हजार २९२ जणांना दुसरा डोस देण्यात आला.