कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोना प्रतिबंधक लस मिळावी यासाठी अगदी पहाटे पासून नागरिक आरोग्य केंद्राच्या आवारात मोठ्या संख्येने येऊन बसतात. या ठिकाणी योग्य प्रकारचे नियोजन नसल्याने तसेच इच्छुकांची अगोदर नोंदणी करण्यात येत नसल्याने येथे सगळा सावळा गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
आज कोणत्या तारखेपर्यंतच लोकांना लस दिली जाणार याबाबतची माहिती ११ वा नंतर लोकांना दिली जाते. त्यामुळे पहाटे पासून तेथे ताटकळत बसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना परत फिरावे लागत आहे. आरोग्य केंद्रातील अशा प्रकारच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रसंगी वादावादीचे ही प्रसंग घडत आहेत. परिणामी आरोग्य केंद्राच्या आवारात जमा होणाऱ्या गर्दीमुळे हे आरोग्य केंद्रच आत्ता कोरोना हॉटस्पॉट बनण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे.
:चौकट :
लस घेतलेल्या सर्व लोकांचा डेटा आरोग्य केंद्राकडे उपलब्ध असणार आहे. ज्यांचे ६ ते ८ आठवडे होत आहेत त्यांच्या नावाची यादी बाहेर फलकावर लावण्यात आली पाहिजेत. त्यामुळे ज्यांचा आज डोस आहे तितकेच लोक प्रतीक्षा रांगेत राहतील व उर्वरित दुसऱ्या दिवशी येतील.
अशा प्रकारचे नियोजन आरोग्य केंद्राने करणे जरूरीचे आहे. त्यामुळे नागरिकांचे होणारे हाल थांबण्यास मोठी मदत होणार आहे.हे नियोजन लावण्यासाठी आरोग्य केंद्राकडे मनुष्यबळाची कमतरता असेल तर सामाजिक कार्यकर्त्यांना तसे मदतीचे आवाहन करावे व चांगल्या प्रकारचे नियोजन करून लसीकरण करण्याची गरज आहे.
---------::---------
फोटो ओळी - हुपरी (ता. हातकणंगले) येथील आरोग्य केंद्राच्या नियोजन अभावी लसीकरणासाठी आवारात जमा होणाऱ्या गर्दीमुळे हे आरोग्य केंद्रच आत्ता कोरोना हॉटस्पॉट बनण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे.