म्हालसवडे : कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने हसूर दुमाला व शिरोली दुमाला या दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरणासाठी पायपीट करत गुरुवारी आलेल्या डोंगराळ व दुर्गम भागातील सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास झाला. तर तुळशी व भोगावती खोऱ्यातील काही गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण पुन्हा आढळून येऊ लागल्याने नागरिकांची चिंताही वाढली आहे .
हसूर दुमाला प्राथमिक आरोग्य केंद्र, सडोली खालसा व कुरुकली उपकेंद्र येथे ३२०० नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे. तसेच शिरोली दुमाला प्राथमिक आरोग्य केंद्र, बीड व बहिरेश्वर येथील उपकेंद्रांमध्ये ४१९० नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. या दोन्ही आरोग्य केंद्रांमध्ये डोंगराळ व दुर्गम भागातील बहुतांश नागरिकांना वाहतुकीच्या पुरेशा सोयींअभावी पायपीट करत लसीकरणासाठी यावे लागत आहे. लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने, गुरुवारी आलेल्या बहुतांश नागरिकांना लस न घेताच मागे फिरावे लागले.
कोरोनामुक्त झालेल्या या पंचक्रोशीत गेल्या काही दिवसांमध्ये हसूर दुमाला, सडोली खालसा, कुरुकली येथे प्रत्येकी एक, शिरोली दुमाला येथे चार व बीडशेड येथे दोघांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राकडून मिळाली आहे. तर पुन्हा लसीकरण सुरू झाल्यानंतर जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. टी. पोळ व डॉ. मधुरा मोरे यांनी केले आहे .