जयसिंगपूर : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली असली तरी रस्त्यावर वाहनधारकांसह विनाकारण फिरणाऱ्यांची गर्दी गुरुवारी पहावयास मिळाली. पालिका व ग्रामपंचायत प्रशासनाकडून संचारबंदीच्या सूचनांचे आवाहन केले जात होते. तर अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या सर्वांनी लसीकरण पूर्ण करावे, अशाही सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
संचारबंदी असल्याने या काळात कोणालाही अत्यावश्यक कारणे वगळता फिरता येणार नाही, अशा सक्त सूचना असल्या तरी जयसिंगपूर, शिरोळसह ग्रामीण भागात विनाकारण गर्दी करणे, त्याचबरोबर शहरात फिरणे असेच चित्र पहावयास मिळाले. कोरोनाला रोखण्यासाठी मास्कचा वापर करा, असे प्रशासन वारंवार सांगत आहे. मात्र, आम्हाला काय होतयं, या भावनेतून मास्क न वापरणारे देखील दिसून येत आहेत.
संचारबंदीच्या पहिल्या दिवशी नगरपालिका व ग्रामपंचायत प्रशासनाकडून सूचनांच्या नियमांचे पालन करण्यात यावे, असे आवाहन केले जात होते. अत्यावश्यक सेवेतील किराणा, बेकरी, भाजीपाला, फळे, दूध डेअरी, खाद्यपदार्थ, दुकाने यामध्ये काम करणाऱ्या सर्वांनी लसीकरण पूर्ण करावे, अशा सूचना देण्यात येत होत्या. जयसिंगपूर येथील क्रांती चौक, शिरोळमध्ये शिवाजी तख्त याठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या नागरिकांची चौकशी केली जात होती.
फोटो - १५०४२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - जयसिंगपूर शहराजवळ नांदणी नाक्यावर संचारबंदीमुळे सकाळच्या सत्रात शुकशुकाट होता.