लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोराेना प्रतिबंधक लसीच्या दुसऱ्या डोसानंतर २८ दिवसांनी रक्तदान करण्यास संबंधित व्यक्ती पात्र ठरणार असल्याने आगामी काळात रक्ताची टंचाई मोठ्या प्रमाणात भासणार आहे. एप्रिल, मे महिन्यात उष्णता वाढत गेल्यानंतर विविध आजार डोके वर काढतात. त्यात अपघात, प्रसूती, थॅलेसिमियाच्या रुग्णांना नियमित रक्तपुरवठा करावा लागतो. यासाठी नागरिकांनी पहिल्यांदा रक्तदान करून नंतर लसीकरण करावे, असा प्रयत्न सुरू आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने लसीकरणासही वेग आला आहे. केंद्रीय रक्तसंक्रमण परिषदेकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदानासंदर्भात मार्गदर्शक प्रणाली जाहीर केली असून यामध्ये कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर २८ दिवस सदर व्यक्ती रक्तदान करू शकत नाही. मुळात उन्हाळ्यात रक्ताची गरज अधिक लागते. अशक्तपणा वाढल्याने अनेक आजार डोके वर काढतात. त्यातच एक-दोन वळिवाचे पाऊस झाले तर साथीचे आजारही हातपाय पसरतात. थॅलेसिया रुग्णांना पंधरा दिवसाला रक्ताची गरज असते, डायलेसीसचे रुग्ण, अपघात व प्रसूती, हृदय शस्त्रक्रियेसाठी रक्ताची गरज भासते. उन्हाळ्यात कोल्हापूर जिल्ह्यातील रक्तपेढ्यातून सरासरी २२० रक्त पिशव्या विक्री होतात.
आता लसीचा पहिला डोस त्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस घेतल्यानंतर २८ दिवसांपर्यंत रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे लस घेतलेल्या व्यक्तीला किमान दोन महिने रक्तदान करता येणार नाही. लसीकरणाचा वेग पाहिला तर महिन्याभरात ३० टक्के लोकांना लसीकरण होईल. या लोकांना पुढील दोन महिने रक्त देता येणार नसल्याने टंचाई भासू शकते.
कोणाला रक्तदान करता येत नाही...
आजारी असलेली व्यक्ती
रक्तदान केल्यानंतर तीन महिने पुन्हा करता येत नाही.
कोणत्याही प्रकारची लस घेतली तर एक ते सहा महिने रक्तदान करता येत नाही.
जिल्ह्यातील रक्तपेढ्या-
ग्रामीण -४
कोल्हापूर शहर -८
सध्याचा स्टॉक -२,१०० पिशव्या
रोजची विक्री- सरासरी २२० पिशव्या
रोज दिली जाणारी लस - १,७००
आतापर्यंतचे लसीकरण - ८९,००७
कोट-
लसीकरणानंतर दोन महिने रक्तदान करता येत नसल्याने एप्रिल, मे महिन्यात रक्ताची टंचाई भासणार आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी लसीकरणापूर्वी रक्तदान करून गरजू रुग्णांचे प्राण वाचवावेत.
- प्रकाश घुंगूरकर (अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा रक्तपेढी असोसिएशन)