लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गेल्या दोन महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्यातील ३ लाखांहून अधिक नागरिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि आरोग्य क्षेत्रातील डाॅक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात प्रशासनाला यश आले आहे. उद्यापासून ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येणार असून त्यादृष्टीने नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरणाला सुरुवात झाली. अगदी सुरुवातीला आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर्स आणि कर्मचारी यांना लसीकरणामध्ये प्राधान्य देण्यात आले. सुरुवातीला या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लसीकरणाकडे दुर्लक्ष केले; परंतु नंतर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना तालुका संपर्क अधिकारी नेमून ही संख्या वाढवण्यावर भर दिला. स्वत: देसाई यांनीही आपल्याकडे चंदगडसह तीन तालुके घेतले होते. त्यामुळे या सर्वांचे लसीकरणाचे प्रमाण ९५ टक्क्यांपर्यंत गेले आहे, तर ४१ टक्केजणांनी दुसरा डोसही घेतला आहे.
दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कस यांना लसीकरण सुरू करण्यात आले. यामध्ये पोलीस, महसूल, जिल्हा परिषद, पंचायत समिती अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांनीच लसीकरणासाठी मोठा प्रतिसाद दिला असून १०२ टक्केजणांनी लस घेतली आहे, तर २३ टक्केजणांनी दुसरा डोसही घेतला आहे.
यानंतर केंद्र सरकारच्या सूचनेनुसार ४५ ते ६० वर्षांच्या दरम्यान जे नागरिक आहेत आणि ज्यांना काही ना काही आजार आहे अशांचे लसीकरण सुरू करण्यात आले. अशा ३१ टक्के, तर ६० वर्षांवरील ३७ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
चौकट
जिल्ह्यातील लस देण्याचे उद्दिष्ट ७ लाख ३० हजार ९३
पहिली लस घेतलेल्यांची संख्या ३ लाख २ हजार ५४७
पहिला डोस घेतलेल्यांची टक्केवारी ४१ टक्के
दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या २२ हजार ३९९
दुसरा डोस घेतलेल्यांची टक्केवारी ३ टक्के