कोल्हापूर : विविध व्याधींमुळे अंथरुणाला खिळलेल्या ५५ नागरिकांचे गुरुवारी महापालिकेने घरी जाऊन लसीकरण केले. यामध्ये जाधववाडी येथील १०५ वर्षांच्या व्याधीग्रस्त नागरिकाचे लसीकरण करण्यात आले.
जे नागरिक केंद्रापर्यंत येऊ शकत नाहीत अथवा अंथरुणावरुन खाली उतरु शकत नाहीत, अशा व्याधीग्रस्तांना घरी जाऊन महापालिकेच्यावतीने लसीकरण करण्याचा निर्णय महापालिका आरोग्य विभागाने घेतला आहे. यामध्ये प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले अंतर्गत ४५ व कसबा बावडा येथे १० व्याधीग्रस्त नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
शहरात ११५० नागरिकांचे लसीकरण
गुरुवारी महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोव्हॅक्सिन डोसचे १० हेल्थ केअर वर्कर व फ्रंटलाईन वर्करचे, १८ ते ४५ वर्षापर्यंत ३४४ नागरिकांचे तर ४५ ते ६० वर्षांपर्यंत ५७७ नागरिकांचे, ६० वर्षांवरील २१९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
आज (शुक्रवारी) १८ वर्षे वयोगटावरील कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेऊन २८ दिवस झाले आहेत अशांना दुसरा डोस प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले, फिरंगाई, राजारामपुरी, पंचगंगा, कसबा बावडा, महाडिक माळ, आयसोलेशन, फुलेवाडी, सदर बाजार, सिध्दार्थ नगर, मोरे माने नगर, भगवान महावीर दवाखाना व कदमवाडी या केंद्रांवर देण्यात येणार आहे.