जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यात कोविड लसीकरण बंद करण्यात आले आहे. शासनाकडून लसीचा पुरवठा झाला नसल्याने जवळपास २५ ठिकाणी सुरू असलेल्या केंद्रांमध्ये आरोग्य विभागाने लसीकरण गुरुवारी थांबविले.
शिरोळ तालुक्यात दोन ग्रामीण रुग्णालये, आठ आरोग्य केंद्र व ३३ उपकेंद्रे आहेत. या अंतर्गत लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले होते. सुरुवातीला ज्येष्ठांना लस दिली जात होती. त्यानंतर ४५ वयोगटावरील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करा, यासाठी शासकीय पातळीवर मोहीम सुरू असतानाच लसीचा तुटवडा निर्माण होत होता. आता या लसीकरणात पूर्णपणे खंड पडला आहे. तालुक्यासाठी २३ हजार लसी मागविण्यात आल्या होत्या. मात्र, साडेतीन हजारच डोस उपलब्ध झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरण वाढवावे, असे आदेश दिले होते. मात्र, बुधवारी तालुक्यातील सर्वच केंद्रांवरील लसी संपल्या होत्या. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरण थांबविण्यात आले. दरम्यान, दुपारनंतर लसीकरणासाठी आलेले नागरिक परत जात होते. जिल्हा पातळीवरून लस उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा लसीकरण सुरू करण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉ. प्रसाद दातार यांनी दिली.
फोटो - ०८०४२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळ - जयसिंगपूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर लस संपली असल्याचा फलक लावण्यात आला होता.