करंजफेण : कोतोली (ता. पन्हाळा) येथील आरोग्यवर्धिनी केंद्रांतर्गत २२ गावातील नागरिकांना लसीकरण देण्यात येत होते. परंतु कमी प्रमाणात लस उपलब्ध होऊ लागल्याने त्याचा तुटवडा जाणवू लागला. त्यामुळे नागरिकांची दवाखान्याच्या दारात गर्दी होते आणि सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरश: फज्जा उडतो. पहाटे पाच वाजल्यापासून दवाखान्याच्या दारात लसीकरण घेण्यासाठी रांगा लागत होत्या. वाढती गर्दी व नियोजनाच्या कमतरतेमुळे लोकांचा संताप होत होता. या बाबीचा विचार करून मंडलाधिकारी सतीश ढेंगे यांनी लसीकरण मोहीम सुरळीत पार पडावी या हेतूने गावोगावात जाऊन लस देण्याचे नियोजन केले आहे. यामुळे दवाखान्यासमोर होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी देखील या नियोजनाचा फायदा होत आहे.
कोतोली,तसेच परिसरातील गावामध्ये जाऊन लसीकरणास सुरूवात झाल्याने वयोवृद्धांची होणारी हेळसांड थांबू लागल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. यामध्ये आरोग्य विभागाचे कर्मचारी, महसूल कर्मचारी, शिक्षक व ग्रामपंचायतीचे योगदान लाभत असून लसीकरण सुरळीत पार पडत आहे.
आळवे गावचे शंभर टक्के लसीकरण
आळवे येथील ४५ वयोगटावरील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने लस घेऊन दुसऱ्या लसीचा डोस देखील पूर्ण केल्याने शंभर टक्के लसीकरण पूर्ण होणारे आळवे हे गाव तालुक्यातील पहिले गाव ठरले आहे.
फोटो : कोतोली (ता. पन्हाळा) परिसरात गावोगावी जाऊन कोरोना लस दिली जाऊ लागल्याने लोक नियमांचे पालन करून लस घेत आहेत.