कोल्हापूर : ज्येष्ठ व व्याधीग्रस्तांचा लसीकरणासाठी प्रतिसाद वाढत असल्याने गर्दी टाळण्यासाठी म्हणून जिल्ह्यात लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. नव्या ११ केंद्रांसह जिल्ह्यातील १३२ केंद्रांवर आजपासून लसीकरण मोहीम वेग घेणार आहे.
कोविड लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ६० वयोगटातील व्याधीग्रस्त नागरिकांना गेल्या सोमवारपासून कोविड लसीकरण सुरू झाले आहे. यासाठी १२० केंद्रे निश्चित करून तेथे आरोग्य विभागाने यंत्रणा लावली. प्रत्येक केंद्रावर चांगली सुविधा पुरविल्याने लसीकरणासाठी येणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. गेल्या आठ दिवसांत साडेअकरा हजार जणांनी लस टोसून घेतली आहे. लस देण्यापासून ते घेतल्यानंतर काय काळजी घ्यावी याबाबात आरोग्य विभागाकडून चांगल्या प्रकारे प्रबोधन होत आहे. त्यामुळे लोकांची लस घेण्याचीही मानसिकता वाढीस लागली आहे.
११ केंद्रांवर आजपासून लसीकरण
कागल व कुरुंदवाड जिल्हा परिषद दवाखाना, वाडी रत्नागिरी तालुका दवाखाना यांच्यासह चन्नेकुप्पी, सुळे, सातवे, तुरुंबे, रुकडी, कुंभोज, कवठेगुलंद, पोर्ले या प्राथमिक आरोग्य केंद्रावर आजपासून लसीकरण सुरू होणार आहे.