कोल्हापूर : महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना लसीकरण करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून होत असलेला लसीचा पुरवठा थांबला असल्यामुळे शनिवारी सलग दुसऱ्या दिवशीही लसीकरण बंद ठेवण्याची नामुष्की ओढवली आहे.
कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत महत्त्वाकांक्षी कोविड लसीकरण मोहीम महापालिकेमार्फत राबविण्यात येत आहे. या लसीकरणासाठी पहिल्या टप्प्यामध्ये हेल्थ केअर वर्कर व फ्रंट लाईन वर्कर यांचा समावेश होता. दुसऱ्या टप्प्यामध्ये ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचा लसीकरणामध्ये समावेश करण्यात आला; परंतु लसीचा पुरवठा होण्यात सातत्य नसल्यामुळे या मोहिमेत सतत विघ्न येऊ लागले आहे.
लस नसल्यामुळे शुक्रवारी लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागली. आज, शनिवारकरिता तरी लस उपलब्ध होईल, अशी अपेक्षा होती, पण संध्याकाळपर्यंत तरी ती आली नाही. त्यामुळे शनिवारी सलग दुसऱ्या दिवशीही सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण बंद राहणार आहे. याची नोंद सर्व नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकडे यांनी केले आहे.