लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : आयजीएम रुग्णालयातील एका सुरक्षारक्षकासह ६६ जणांना शनिवारी (दि. १६) कोव्हिशिल्ड लस देण्यात आली. त्यामध्ये सुरक्षारक्षकासह तिघांना ताप व अस्वस्थपणाचा त्रास जाणवला. याबाबतची माहिती रुग्णालयाच्या व्यवस्थापनाला समजताच त्यांनी तपासणी करून प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना हा त्रास होतो. मात्र, यामध्ये कोणतीही भीती नसल्याचे सांगितले.
देशभरात कोरोनामुळे अनेक नागरिकांनी जीव गमावले होते. या आजारावर मात करण्यासाठी केंद्र शासनाने कोव्हिशिल्ड लस उपलब्ध केली. त्या लसीचा प्रारंभ शनिवारी (दि. १६) आयजीएम रुग्णालयात करण्यात आला. पहिल्या टप्प्यामध्ये ६६ जणांना लस देण्यात आली. यामध्ये सुरक्षारक्षक कांबळे यांच्यासह तिघांना ताप, थंडी व डोकेदुखीचा त्रास झाला. त्यांना तत्काळ आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, त्यांच्या आजाराबाबत योग्य ती तपासणी सुरू आहे. ही माहिती समजताच अनेक नागरिकांतून उलट-सुलट चर्चा सुरू होती. याबाबत रुग्णालय व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना हा त्रास होतो. याबाबत नागरिकांनी घाबरू नये, असे स्पष्ट केले.