लोकमत न्यूज नेटवर्क :
दहा हजार लोकसंख्या असणारे माणगाव येथे फक्त १३३४ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे लसींची आवश्यकता असताना साजणी प्राथमिक आरोग्य केंद्रातून लस संपल्याने नागरिकांना लसीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
साजणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत माणगाव, माणगाववाडी, साजणी, तिळवणी व कबनूर ही आरोग्य केंद्रे येतात. या आरोग्य केंद्रांकडून गेली पंधरा दिवस लस देण्याचे सुरू आहे. साजणी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे ३५३० डोस उपलब्ध झाले होते. यापैकी ३५०५ नागरिकांना डोस देण्यात आले असून काल आणखी दहा डोस कुंभोज प्राथमिक आरोग्य केंद्राकडून उपलब्ध करून लस देण्यात आली. लसीसाठी नागरिकांचा थंडा प्रतिसाद मिळत आहे. कबनूर आरोग्य केंद्रास १०८०० लसींचे लक्ष्य असताना, तेथे फक्त १०३२ नागरिकांनी लस घेतली आहे. पुढील गावांना दिलेल्या लक्ष्यापैकी माणगाववाडी येथे ६०० पैकी पन्नास, माणगाव ३४०८ पैकी १३३४, तिळवणी १६४७ पैकी २७९, साजणी २१६२ पैकी ८१० नागरिकांनी लस घेतली आहे. सध्या दहा लसी शिल्लक असून त्या अत्यावश्यक रुग्णांसाठी ठेवण्यात आल्या आहेत, असे साजणी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षद बोरगावे यांनी सांगितले.