कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून लस टंचाईचा सामना करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याला शनिवारी सकाळी एक लाख डोस उपलब्ध झाले. त्यापैकी ८ हजार ८४८ नागरिकांना दिवसभरात लस देण्यात आली असून, आता दोन दिवस पुरेल एवढी लस उपलब्ध झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात चार दिवसांपूर्वी सरासरी ३५ हजार नागरिक लस घेत होते. मात्र, हा वेग वाढत असतानाच लसच संपल्याने अनेक केंद्रांवर लस संपल्याचे फलक लावावे लागले. त्यामुळे अनेक नागरिकांची कुचंबणा झाली. २३६पैकी १९८ केंद्रांवर शुक्रवारी लसीकरण झाले नाही. लस मिळावी यासाठी सातत्याने राज्य पातळीवर पाठपुरावा सुरू होता.
अखेर शनिवारी सकाळी जिल्ह्यासाठी १ लाख डोस उपलब्ध झाले. त्याआधीच बाराही तालुक्यातील लस वाहतुकीसाठी वाहने मागविण्यात आली होती. दहा तालुक्यातील दहा गाड्या आणि शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील १८ गाड्यांमध्ये लगेच लस भरून ती प्रत्येक केंद्रांवर पोहोच करण्यात आली. परंतु तरीही दिवसभरामध्ये केवळ ८ हजार ८४८ जणांना लस देता आली. आता उर्वरित लस तीन दिवस पुरू शकणार आहे. या दोन दिवसातील लसीकरणाचा वेग पाहून पुन्हा नव्याने लसीची मागणी नोंदविण्यात येणार आहे.
चौकट
दिवसभरातील लसीकरण
गट पहिला डोस दुसरा डोस
आरोग्य कर्मचारी ६१ १२४
फ्रंट वर्कर १०१ १४८
४५ वर्षांवरील नागरिक ५५८६ १३८
६० वर्षांवरील नागरिक २३९२ २९८
एकूण लसीकरण ८१४० ७०८
एकूण ८८४८