कोल्हापूर : कोविशिल्डचीही लस संपल्याने जिल्ह्यात बुधवारी लसीकरण होणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी लस नसल्याने विनाकारण धावपळ करू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. मंगळवारी दिवसभरात ११ हजार ६३३ नागरिकांना लस देण्यात आली आहे.
तीन दिवसांपूर्वी ७४ हजार डोस जिल्ह्यात आले होते. त्यामुळे सोमवारी दिवसभरामध्ये उच्चांकी सुमारे ५१ नागरिकांना डोस देण्यात आले. उर्वरित लस मंगळवारी देण्यात आली. त्यामुळे आता लस शिल्लक नाही. पुण्यात याबाबत चौकशी केल्यानंतर नेमकी कधी लस पाठवली जाणार, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे बुधवारी पुण्याहून निरोप आल्यानंतर डोस आणण्यासाठी वाहन पाठवण्यात येणार आहे. मंगळवारी ७ हजार २०१ नागरिकांनी पहिला तर ४ हजार ४३२ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील लसीकरण केंद्रे बंद राहणार असून नागरिकांनी लस घेण्यासाठी जाऊ नये, असे आवाहन लसीकरण मोहिमेचे समन्वय अधिकारी डॉ. फारुक देसाई यांनी केले आहे.