चंदगड : चंदगड ते नागवे रस्त्यावर शनिवारी खासगी वडाप करणाऱ्या ट्रॅक्सवरून पडून येथील तुकाराम गुरव या शेतकरी युवकाचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे चंदगड तालुक्यातील वडापची समस्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वडापच्या लहान-मोठ्या अपघातांचा विचार केला तर गेल्या दहा-बारा वर्षांत तालुक्यात ४३ जणांचा बळी गेला आहे. तालुक्यात अवैध धंदे, वडाप सर्वच बंद आहे, असा डंका वाजविला जात आहे. मग रस्त्या-रस्त्यांवर दिसणारी वडाप वाहने पाहिली की, यांना पोलिसांचा आशीर्वाद आहे काय? अशी चर्चा सुरू आहे. तालुक्यात सध्या चंदगड-बेळगाव, हलकर्णी-पाटणे फाटा-बेळगाव, कोवाड-बेळगाव, ढोलगरवाडी-कोवाड, कोवाड-नेसरी, तुडीये-बेळगाव, चंदगड-नागवे, चंदगड-पाटणे, चंदगड-कानुर, चंदगड-अडकूर, आदींसह तालुक्यातील अनेक मार्गांवर खुली जोरदार वाहतूक सुरू आहे. वडाप करणाऱ्यांमध्ये ५५ मिनिबस, ३० कु्रझर गाड्या, १७२ टॅक्स, आदी वाहनांद्वारे तालुक्यातील प्रवाशांची वाहतूक केली जाते. प्रवासी मिळविण्यासाठी वाहने भरधाव वेगाने पळविणे, प्रवाशांना दाटीवाटीने बसवून वाहनात क्षमतेपेक्षा अधिक लोक बसविणं, आदी प्रकार वडापवाल्यांकडून केले जातात. प्रवासी मिळविताना झालेल्या अपघातांमध्ये दाटे गावाजवळ एस. टी. - टेम्पो अपघातामध्ये नऊजण जागीच ठार झाले होते. त्यानंतर तेथेच सहा महिन्यांनंतर प्र्रा. चित्तवाडगीसह दोघेजण अपघातामध्ये मरण पावले होते. बेळेभोट येतील वळणावर नागनवाडी पेट्रोलपंपावर शिनोळी गावाजवळ अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. वडापवाले वडाप करताना आर. टी. ओ.चे सर्व नियम धाब्यावर बसवून राजरोपणे वडाप करीत आहेत. सुपेनजीक असलेल्या आर. टी. ओ. नाक्यावर अशा अवैध धंद्यांच्या वाहनांवर एकही गुन्हा दाखल केल्याची नोंद नाही; तर चंदगड पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी शासकीय मोटारसायकल घेऊन सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शिनोळी येथील एका सांस्कृतिक क्लबसमोर गाडी लावून थांबलेले असतात. परंतु त्यांनी या बेकायदेशीर वाहनांवर काय कारवाई केली, हा संशोधनाचाच विषय आहे. मात्र, सामान्य लोकांची मोटारसायकल अडवून त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाते व त्यातील त्रुटींवर बोट ठेवून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. वडाप वाहतुकीबाबत एस. टी. डेपोच्या सूत्रांशी संपर्क साधला असता त्यांनी वडापमुळे कमी गर्दीच्या हंगामात सुमारे ५० हजार, तर जास्त गर्दीच्या हंगामामध्ये दररोज अंदाजे एक लाखापेक्षा अधिक आर्थिक नुकसान होत असल्याचे सांगितले. या गंभीर समस्येकडे एस. टी.च्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी पोलीस अधिकाऱ्यांकडे वडापची माहिती लेखी-तोंडी स्वरूपात दिली आहे. मात्र, पोलिसांकडून यावर काहीही हालचाल न झाल्यामुळे एस. टी. मंडळाने तालुक्यातील वडाप करणाऱ्या वाहनांची नागनवाडी, चंदगड, कोवाड, अडकूर, आदी मार्गावर गणती सुरू केली असून, त्याचा अहवाल दररोज एस. टी. महामंडळ व शासनाकडे पाठविला जात आहे. चंदगड येथील जुन्या एस. टी. स्टँडवर थांब्यापासून सुमारे १०० मीटर मागे एस. टी. बसेस थांबविण्याची सूचना पोलिसांनी दिलेली आहे. याची एस. टी. प्रशासनाकडून तंतोतंत अंमलबजावणी केली जात आहे. मात्र, वडापच्या वाहनांना या थांब्यावरच गाड्या उभ्या करण्यासाठी जागा दिल्याची चर्चा होत आहे. खराब रस्ते पोलिसांच्या पथ्यावरतालुक्याची भौगोलिक रचना पाहिली तर अजूनही काही गावांना रस्ते नाहीत. आहेत ते खराब आहेत. त्यामुळे काही गावांमध्ये अद्यापही एस.टी. पोहोचलेली नाही. त्यामुळे अशा गावांतील नागरिकांना वडापवरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे येथील वडाप चालकांकडून पोलीस चिरीमिरी घेतात. त्याच चिरीमिरीमधून महिन्याला लाखो रुपयांचा मलिदा पोलिसांपर्यंत पोहोचला जातो, याची उघड चर्चा आहे.
वडाप वाहतूक एस.टी.च्या मुळावर
By admin | Published: November 15, 2015 8:57 PM