कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे १५ एप्रिल २०२१ पासून पुन्हा राज्यात सरकारने प्रथम आठ दिवसांचा लाॅकडाऊन आणि त्यानंतर कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यात कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना संसर्गाची वाढती संख्या आणि वाढता मृत्यूदरामुळे जिल्ह्याची गणना वर्गवारीनुसार शासनाने चौथ्या क्रमांकाची केली आहे. यात वाढती संख्या आणि रोजचे मृत्यू कमी आले तर तिसऱ्या वर्गवारीत जिल्ह्याला स्थान मिळणार आहे. त्यामुळे काहीअंशी निर्बंध कमी होतील. त्याचा फायदा एस. टी. महामंडळाच्या बसना होईल. या बस पूर्ण क्षमतेने आंतर ग्रामीण भागात नियमित प्रवासी सेवा देतील. रुग्ण संख्या आणि मृत्यू दर वाढता राहीला तर ही सेवा पन्नास टक्के क्षमतेनेच सुरू राहणार आहे. याकाळात सर्वसामान्यांना एस. टी. बस मार्गावर नसल्याने वडाप अर्थात सहा आसनी रिक्षा, तीन आसनी रिक्षा आदींची प्रवासासाठी मदत घ्यावी लागत आहे. अनेकांची इच्छा नसतानाही केवळ प्रवासासाठी पर्याय नसल्याने वडापसह खासगी वाहनांचाच आधार घ्यावा लागत आहे.
या गावांना अद्यापही बससेवा सुरू नाही
जिल्ह्याच्या बारा तालुक्यांमध्ये एस. टी. महामंडळाचे आगार आहे. यात कागल, आजरा, चंदगड, गडहिंग्लज, शाहूवाडी, शिरोळ, इचलकरंजी, राधानगरी, गारगोटी, मुरगुड, कुरुंदवाड, मलकापूर या आगाराअंतर्गत येणाऱ्या तालुक्यांमधील अंतर्गत ग्रामीण भागातील सर्व गावांमध्ये एस. टी. ची बससेवा कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे बंद आहे. ही सेवा राज्य शासनाने निर्बंध कमी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बससेवा सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतरच सुरु होणार आहे. सध्या केवळ तालुका ते कोल्हापूरातील मध्यवर्ती बसस्थानक आणि पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, मुंबई या जिल्ह्यातील प्रमुख बसस्थानकांवरच बस जात आहेत.
प्रवाशांना वडापसह खासगी वाहनांचा आधार
एसटीच्या बसेस केवळ जिल्हा ते तालुका आणि तालुका ते जिल्हा या मार्गावरच सुरु आहेत. त्यामुळे आंतर ग्रामीण भागातील वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. त्यामुळे प्रवाशांना खासगी प्रवासी वाहनांसह वडापचा आधार प्रवासासाठी घ्यावा लागत आहे.
सध्या सुरु असलेल्या बसची संख्या - ३५५
आगारात उभी असलेल्या बस संख्या - ३४५
एकूण कर्मचारी
चालक - १५००
वाहक -१५००
सध्या कामावर असलेले कर्मचारी
चालक - ७१०
वाहक -७१०
प्रतिक्रिया
आंतरग्रामीण भागात अद्यापही बस सेवा सुरु नसल्याने वडापचा आधार घ्यावा लागत आहे. एस.टी. बस सुरु झाल्यातर प्रवास सुखकर आणि सुरक्षित होतो.
पाेपट पाटील, करनूर, कागल
प्रतिक्रिया
एस.टी. बस सर्वसामान्यांचा आधार आहे. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे ती बंद आहे. या काळात सर्वसामान्यांचा ग्रामीण भागात खासगी वाहनांचाच आधार आहे.
- सागर पाटील, निगवे