लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकूळ) निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून करवीरचे प्रातांधिकारी वैभव नावडकर यांची गुरुवारी सहकारी निवडणूक प्राधिकरणाने नियुक्ती केली. साधारणत: २५ मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होऊन २ मे रोजी मतदान होण्याची शक्यता आहे.
‘गोकूळ’ची अंतिम यादी १२ मार्चला प्रसिध्द झाल्यानंतर प्राधिकरणाने निवडणूक निर्णय अधिकारी नेमणुकीची प्रक्रिया सुरू केली होती. ही जबाबदारी सहकार व महसूल विभागातील अधिकाऱ्याकडे जबाबदारी द्यायची, यावर प्राधिकरणाच्या पातळीवर खल सुरू होता. ‘गोकूळ’ची निवडणूक संवेदनशील आहे, दोन्ही गटातील इर्षा, न्यायालयीन लढाई पाहता येथे महसूलमधील अधिकाऱ्यावर जबाबदारी देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार करवीरचे प्रातांधिकारी वैभव नावडकर यांची नियुक्ती प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी केली.
अंतिम यादी प्रसिध्द झाल्यानंतर दहा ते वीस दिवसात प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करायचा असतो. त्यानुसार प्रक्रिया राबवावी लागणार आहे. मार्च अखेर असल्याने महसूल यंत्रणेवर ताण असतो, त्यामुळे त्यानंतर प्रक्रिया सुरू होऊ शकते. त्यानुसार साधारणत: २५ मार्चपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे.
शरद पाटील, गजेंद्र देशमुख सहाय्यक
इचलकरंजीचे वरिष्ठ तहसीलदार शरद पाटील व सहायक निबंधक (दुग्ध) डॉ. गजेंद्र देशमुख यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्ती करावी, म्हणून प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवला आहे.
बाचणीच्या दूध संस्थेची याचिका फेटाळली
बाचणी (ता. कागल) येथील दूध संस्थेने निवडणूक घेण्याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळण्यात आली असून राज्य शासनाच्या आदेशानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले.
संभाव्य निवडणूक कार्यक्रम
अर्ज दाखल - २५ मार्च ते २ एप्रिल
छाननी - ५ एप्रिल
पात्र उमेदवारांची यादी - ६ एप्रिल
माघार - २२ एप्रिल
मतदान - २ मे