कोल्हापूर : वैशाख महिन्यात सरासरी कमाल तापमानाने ३६ अंशांची पातळी गाठली आहे़ यामुळे सकाळपासूनच अंगातून घामाच्या धारा वाहत असून, कोल्हापूरकरांना ‘अंगी वणवा पेटला’ची प्रचिती आली़ उन्हाच्या असह्य झळांमुळे थंडी-ताप, तसेच मूत्रविकारांनी त्रस्त रुग्णांनी हॉस्पिटलकडे धाव घेतली़ रणरणत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी संधी मिळताच त्यांनी शहरातील उद्याने आणि शीतपेयगृहे गाठली़ घर, कार्यालये, मॉल्स येथील पंख्यांची पाती वेग घेत होती़ एसी, कूलर अव्याहतपणे सुरू होते़ रस्त्यावरील फेरीवाले, भाजीविक्रेते, हमाल यांना घामाच्या धारा गाळतच दिवस काढावा लागला़ उन्हामुळे पाणपोई, शीतपेयगृहांमध्ये कोरड पडलेल्या घशांना दिलासा देण्यासाठी प्रचंड गर्दी झाली़ उन्हापासून संरक्षण करण्यासाठी डोक्यावर रुमाल टाकून, शक्य असलेल्या ठिकाणी छत्रीचा आसरा फळ आणि भाजीविक्रेत्यांनी घेतला़ खरेदीसाठी बाहेर पडलेल्या महिला स्कार्फ परिधान करूनच घराबाहेर पडल्या़ कधी छत्रीचा, तर कधी वृक्षांच्या सावलीचा आधार घेत रणरणत्या उन्हापासून संरक्षण करण्याचा प्रयत्न केला़ दुपारी बाराच्या सुमारास तापमानाचा पारा ३६ अंशांवर गेल्यामुळे नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले़ त्यामुळे रिक्षा व्यावसायिकांपासून ते हॉटेल व्यावसायिकांपर्यंत सर्वांना ग्राहकांची वाट पाहावी लागली़ (प्रतिनिधी)रिक्षावाल्यांनी घेतला ‘सावली स्टॉप’चा आधारअनेक रिक्षांना फायबरचेकवच आहे़ उन्हात हे कवच जास्त तापत असल्यामुळे रिक्षातील प्रवाशांना दाटीवाटीबरोबरच उकाड्याचा त्रास सहन करावा लागला़ दुपारी बारानंतर रिक्षावाल्यांनीही सावली बघूनच रिक्षा थांबवत उन्हापासून मुक्त होण्याचा प्रयत्न केला़ बागेचा अन् शीतपेयगृहांचा आसरा रणरणत्या उन्हामुळे आणि उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांनी शहरातील बागांमध्ये विसावा घेतला़ वाऱ्याची झुळुक अनुभवण्यासाठी नागरिकांनी टाउन हॉल, गंगावेश, महावीर गार्डन येथील बागांमध्ये पहुडणे पसंत केले़ घशाला पडलेली कोरड शमविण्यासाठी नागरिकांनी शीतपेयगृहांत एकच गर्दी केली़ त्यामुळे शहरातील राजारामपुरी, भाऊसिंगजी रोड, गंगावेश, मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील शीतपेयगृहे फुल्ल झाली होती़
वैशाख पेटला, उष्म्याने हैराण
By admin | Published: April 22, 2015 9:50 PM