कोल्हापूर : प्रियकरासोबत लिव्ह इनमध्ये राहण्याचा आग्रह धरणाऱ्या तरुणीला तिच्या विचारापासून परावृत्त करण्यासाठी मारहाण करण्याचा सल्ला देवठाणे (ता. पन्हाळा) येथील मठातील महाराजाने दिला होता, अशी माहिती मृत तरुणी वैष्णवी पोवार हिच्या आईच्या चौकशीतून समोर आली. त्यामुळे या गुन्ह्यातील पाचवा आरोपी निष्पन्न झाला असून, त्याच्या अटकेसाठी लक्ष्मीपुरी पोलिस पुण्यात पोहोचले आहेत. दरम्यान, मारहाणीत सहभागी असलेला मठातील सेवक प्रशांत ऊर्फ नऱ्या संदीप शेवरे (२६, रा. देवठाणे) याला पोलिसांनी अटक केली. मारहाण झालेल्या मठाचा कारभारही संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.शनिवार पेठेतील वैष्णवी लक्ष्मीकांत पोवार (२४) हिने पुण्यातील मित्रासोबत लिव्ह इनमध्ये राहण्याचा आग्रह धरला होता. मात्र, तिचा निर्णय आईला मान्य नव्हता. त्यामुळे देवठाणे येथील महाराजांकडून तिचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न आईकडून सुरू होता. संबंधित महाराज पुण्यातील एका भक्ताकडे राहण्यासाठी गेल्याने बुधवारी (दि. ३) शुभांगी पोवार ही मुलगी वैष्णवी, मुलगा श्रीधर आणि मानलेला भाऊ संतोष आडसुळे यांना घेऊन पुण्याला गेली. तिथे महाराजांनी वैष्णवीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली. मारहाण करून तिला तिच्या निर्णयापासून परावृत्त करा, असा सल्ला महाराजाने तिच्या आईला दिला. मारहाणीसाठी तिला देवठाणे येथील मठात घेऊन जाण्यासही त्याने सांगितले.त्यानुसार आई शुभांगी ही सर्वांना घेऊन देवठाणे येथील मठात पोहोचली. त्यानंतर झालेल्या अमानुष मारहाणीत वैष्णवीचा दुर्दैवी मृत्यू झाला. महाराजाच्या सांगण्यावरूनच तिला मारहाण झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्याने पोलिस त्याच्या अटकेसाठी पुण्यात पोहोचले आहेत. लवकरच त्याला बेड्या ठोकणार असल्याची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिली.
चौथा संशयित पोलिस कोठडीततरुणीला मारहाण करणाऱ्यांमध्ये मठातील सेवक प्रशांत शेवरे याचाही सहभाग होता. त्यानेच तरुणीला बेदम मारहाण केल्याचे चौकशीत समोर येताच लक्ष्मीपुरी पोलिसांनी त्याला मठातून अटक केली. सध्या तो पोलिस कोठडीत आहे.मठाचा कारभार रडारवरदेवठाणे येथील मठातील संशयित महाराजाचे भक्त अनेक ठिकाणी आहेत. बराच काळ तो पुण्या-मुंबईतील भक्तांकडे घालवतो. देवठाणे येथील ग्रामस्थांशी गोड बोलून त्याने मठासाठी जागा घेतली. मात्र, त्या मठात नेमके काय चालते? अशी चर्चा आता परिसरात सुरू झाली आहे. वैष्णवीला मठातच बेदम मारहाण झाली होती. मारहाण करण्यात मठातील सेवक संतोष आडसुळे याचाही सहभाग होता. त्यामुळे मठाचा कारभार पोलिसांच्या रडारवर आला आहे.