कोल्हापूर : विशाळगडावर साहसी क्रीडा प्रकाराची आवड असणाऱ्या कोल्हापुरातील साहसप्रेमींसाठी साडेसहाशे फुटांवरील ‘झीप लाईन (व्हॅली क्रॉसिंग) थरारक अशा क्रीडा प्रकाराचे आयोजन ‘वेस्टर्न माउंटन स्पोर्टस्’, ‘हिल रायडर्स गु्रप’ यांच्यावतीने १६, १७ आणि १८ जानेवारी रोजी केले आहे. ‘वेस्टर्न माउंटन स्पोर्टस्’, ‘हिल रायडर्स गु्रप’ यांनी आतापर्यंत अनेक साहसी मोहिमांचे यशस्वी आयोजन केले आहे. यामध्ये ट्रेकिंग, रॉक क्लायबिंग आणि हिमालयातील ट्रेकिंग, पर्वतारोहण मोहिमांचा सहभाग आहे. या अनुभवाच्या पाठबळावरच एक महत्त्वाकांक्षी मोहीम पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच आयोजित केली आहे. ‘झीप लाईन’ हा गिर्यारोहणातील एखादी मोठ्या अंतराची दरी पार करण्यासाठी वापरण्यात येणारा प्रकार आहे. दरीच्या दोन्ही बाजूला दोर फिक्स करताना जेथून सुरुवात करावयाची ती बाजू उंचावर आणि जिथे आपण उतरणार ती बाजू थोड्याशा तिरक्या अँगलमध्ये फिक्स करण्यात येते. म्हणजेच गुरुत्वाकर्षणाच्या नैसर्गिक शक्तीचा वापर करून ती व्हॅलीक्रॉस होण्यास मदत होते. अशा पद्धतीची व्हॅली विशाळगडावर असल्याने तेथील कड्यावरून या खेळाची सुरुवात होणार आहे. अशा प्रकारचा साडेसहाशे फुटांचा थरारक प्रकार केवळ उच्च दर्जाचे गिर्यारोहणाचे साहित्य वापरून व योग्य तंत्र वापरून करण्यात येणार आहे. यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सर्व प्रकारचे साहित्य वापरण्यात येणार आहे. अशा प्रकारचे साहसी प्रकार व्यावसायिकदृष्ट्या पुणे, मुंबईच्या भागात आयोजित केल्या जातात. हाच प्रकार कोल्हापूरच्या साहसी गिर्यारोहकांनाही अनुभवता यावा म्हणून विनोद कांबोज, प्रमोद पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.
विशाळगडावर १६ रोजी ‘व्हॅली क्रॉसिंग’चा थरार
By admin | Published: January 07, 2016 12:19 AM