कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दागिन्यांचे उर्वरीत दोन वर्षांचे मूल्यांकन सोमवारी पुन्हा सुरू झाले. सन २०१९ सालापासूनच्या दागिन्यांचे मूल्यांकन जून महिन्यात सुरू झाले होते, मात्र चार दिवसांनी ते थांबवण्यात आले होते. पण, आता पुन्हा मूल्यांकनाचे काम सुरू झाले असून, पुढील चार दिवसांत दागिन्यांचे नेमके मूल्य समजेल.श्री अंबाबाईला भक्तांनी अर्पण केलेल्या सन २०१९ सालापासूनच्या दागिन्यांचे मूल्यांकन होणे बाकी होते. त्यासाठी नाशिकच्या निती वडनेरे यांच्या कंपनीने देवीसाठी ही विनामूल्य सेवा देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार १८ जूनपासून मूल्यांकन सुरू करण्यात आले. मात्र, त्यावेळी चार दिवसांत ऑक्टोबर २०२२ पर्यंतच्याच दागिन्यांचे मूल्यांकन होऊ शकले. त्यानंतर संस्थेच्या तांत्रिक कारणामुळे हे काम थांबले होते. मात्र, सोमवारपासून संस्थेने पुन्हा मूल्यांकनास सुरुवात केली. या दागिन्यांमध्ये मणी, मंगळसूत्र, जोडवी, पाळणे, हार, नेकलेस, पूजेचे साहित्य, अशा विविध अलंकारांचा सामावेश आहे.पुढील चार दिवसांत मूल्यांकनाचे काम संपण्याची शक्यता आहे. त्यानंतर दागिन्यांचे वजन, टंच काढल्यावर त्यांचे आजच्या बाजारभावाप्रमाणे खरे मूल्य समजेल. यावेळी मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे, खजिनदार महेश खांडेकर यांच्यासह संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.
कोल्हापुरातील अंबाबाईच्या दागिन्यांचे मूल्यांकन पुन्हा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 4:17 PM