संदीप आडनाईककोल्हापूर : सेमीस्पीडची आरामदायी वंदे भारत रेल्वे कोल्हापूरकरांच्या सेवेत दाखल होऊन एक महिना झाला. कोल्हापूर आणि पुणे या दोन्ही ठिकाणांहून ६० टक्के प्रवाशांनी याचा लाभ घेतल्याने ही गाडी फायद्याची ठरली आहे.आयटी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या तरुणांना पुण्याहून कोल्हापुरात येण्यासाठी हा गाडी आरामदायी आणि सोयीची ठरली आहे. रेल्वेने दिलेल्या आकडेवारीनुसार या महिन्यात या गाडीतून ३५०० प्रवाशांनी कोल्हापूर गाठले तर ३००० प्रवाशांनी पुण्यापर्यंत प्रवास केला. या गाडीला मिळालेल्या प्रतिसादामुळे आता मुंबईपर्यंत वंदे भारत सोडण्याच्या मागणीवर विचार होत आहे.कोल्हापूर ते पुणे आणि पुणे ते हुबळी मार्गावर सोमवार, दि. १६ सप्टेंबर रोजी वाजतगाजत कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्स येथून या नव्या वंदे भारत एक्स्प्रेसचा प्रारंभ झाला. या गाडीला केंद्रीय रेल्वे आणि जलशक्ती राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांनी हिरवा झेंडा दाखवला होता. या रेल्वेला केवळ सातारा, कऱ्हाड, किर्लोस्करवाडी, सांगली आणि मिरज हे थांबे आहेत. या रेल्वेची पुणे मार्गावर ताशी ९० किलोमीटर वेगाने चाचणी यशस्वी झाली असली तरी ही गाडी सध्या ६२ किलोमीटर प्रतितास वेगाने धावते आहे. ३२६ किलोमीटरचे अंतर ही गाडी ५ तास १५ मिनिटांत पूर्ण करते.कोल्हापूर-पुणे (क्रमांक २०६७३) ही गाडी दर गुरुवार, शनिवार आणि सोमवार सकाळी ८:१५ वाजता कोल्हापुरातून सुटते आणि पुण्यात १:३० वाजता पोहोचते तर पुणे-कोल्हापूर (क्रमांक २०६७४) ही गाडी दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी दुपारी २:१५ वाजता सुटते आणि कोल्हापुरात सायंकाळी ७:४० वाजता पोहोचते. या गाडीपाठोपाठ सकाळी ८:२० वाजता कोयना एक्स्प्रेस कोल्हापुरातून सुटते. या दोन्ही गाड्यांमध्ये फक्त पाच मिनिटांचेच अंतर आहे. या वंदे भारतची क्षमता ५३० प्रवाशांची आहे. यातील ४७८ सीट एसी चेअर कारची आहे तर ५२ एक्झिक्युटिव्ह आहे. कोल्हापूर ते पुणे आणि पुणे ते कोल्हापूर या मार्गावर आतापर्यंत प्रतिदिन १३० ते १६० प्रवासीच प्रवास करत असल्याची नोंद आहे. ही टक्केवारी ३० टक्केच आहे. शनिवारी कोल्हापुरातून धावलेल्या वंदेभारत गाडीतील प्रवाशांची संख्या १५३ होती. तर पुण्यातून येणाऱ्या गाडीत १४४ प्रवाशांनी प्रवास केला. एक्झिक्युटिव्ह क्लासमध्येही २५ सीट बुक होत्या.
'वंदे भारत'ला महिना पूर्ण, पुण्याहून कोल्हापूरला येणाऱ्या प्रवांशासाठी फायदेशीर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 12:42 PM