कोल्हापूर : अल्पवयीन शाळकरी मुलीची वारंवार छेड काढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी व्हन्नूर (ता. कागल) येथील दोघा सख्ख्या भावांसह एकूण तिघांना तीन वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सौरभ संजय बोराटे (वय १९), विशाल संजय बोराटे (२१) आणि ऋषिकेश संजय हजारे (२०), अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.
कागल पोलीस ठाण्यात २०१८ मध्ये पोक्सो कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यातील तिन्हीही आरोपींना विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. महात्मे यांनी बुधवारी ही शिक्षा सुनावली. सरकारतर्फे विशेष सरकारी वकील अमिता ए. कुलकर्णी यांनी काम पाहिले.
खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की, शहरालगतच्या एका गावात पीडित अल्पवयीन मुलगी शालेय शिक्षण घेत आहे. ती शाळेत जाताना सौरभ बोराटे, विशाल बोराटे आणि ऋषिकेश हजारे तिचा शाळेच्या गेटपासून व्हरांड्यापर्यंत पाठलाग करून लैंगिक छळ करीत होते. त्या रोजच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने कागल पोलिसांत नोव्हेंबर २०१८ मध्ये तिघा संशयितांविरोधात तक्रार दिली होती. त्यानुसार तिघांवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला होता.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक दिलीप जाधव यांनी केला. गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. खटल्याची सुनावणी न्यायाधीश ए. एस. महात्मे यांच्या न्यायालयात सुरू होती. सुनावणीत पाच साक्षीदार तपासले. साक्षीदारांच्या साक्षी, तसेच उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे आणि विशेष सरकारी वकील कुलकर्णी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने सौरभ बोराटे, विशाल बोराटे आणि ऋषिकेश हजारे या तिघांना ३ वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी ॲड. भारत शिंदे, ॲड. महेंद्र चव्हाण, ॲड. मीना पाटोळे, महिला पोलीस नाईक मीनाक्षी शिंदे, माधवी बोडके यांचे सहकार्य लाभले.