आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि.१0 : वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनीतील चोरी प्रकरणातील संशयित आरोपी निलंबित पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट व सहायक पोलीस निरीक्षक सूरज चंदनशिवे या दोघांनी मंगळवारी (दि. ९) न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश वृषाली जोशी यांच्या न्यायालयात या अर्जावर सुनावणी होणार आहे.
शिक्षक कॉलनी चोरी प्रकरणात संगनमताने नऊ कोटी १८ लाख रुपये परस्पर हडप करणारे सांगलीचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निलंबित पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहायक पोलीस निरीक्षक सूरज चंदनशिवे, सहायक फौजदार शरद कुरळपकर, कॉन्स्टेबल शंकर पाटील, दीपक पाटील, पोलीस नाईक रवींद्र पाटील, कुलदीप कांबळे यांच्याविरोधात कोडोली पोलिसांत चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत.
यापूर्वी चौघांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केले होते. या सर्वांचे अर्ज न्यायालयाने फेटाळले, याची कल्पना घनवट व चंदनशिवे यांना असूनही त्यांनी अर्ज दाखल केले आहेत. अटकेला बगल देण्यासाठी सामूहिक चर्चेने दोन टप्प्यांत अर्ज दाखल केल्याची चर्चा आहे. न्यायालयाने संशयित मैनुद्दीन मुल्ला याचे साथीदार महादेव ढोले व संदीप तोरस्कर यांचाही जामीन अर्ज फेटाळला. या चोरी प्रकरणाची व्याप्ती वाढत आहे.
‘सीआयडी’च्या पथकाकडून संशयितांच्या मालमत्तेची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. चोरीचा पैसा कुठे गुंतविला, त्यातून काय खरेदी केले याची ते माहिती घेत आहे. घनवट व चंदनशिवे यांचे अर्ज फेटाळले जाणार असल्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर सर्व संशयित स्वत:हून हजर राहणार असल्याची चर्चा आहे.