कोल्हापूर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त कोल्हापूर, सांगली, सातारा येथील महाविद्यालयांत विविध उपक्रमांचे आयोजन करावे, या मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीने शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांना दिले.
जयंती विचाराने साजरी करण्याच्या दृष्टिकोनातून महाविद्यालयांमध्ये वक्तृत्व, निबंध, एकांकिका स्पर्धा, संविधानाचा जागर असे उपक्रम राबवावेत. या स्पर्धांचे निकाल समितीला कळविण्यात यावेत, अशी मागणी या निवेदनाद्वारे या समितीच्या शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला जाईल, असे समितीचे अध्यक्ष प्रा. शरद गायकवाड आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे यांनी सांगितले. त्यावर समितीची मागणी विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यसन समितीचे संचालक श्रीकृष्ण महाजन यांना सांगून त्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही डॉ. शिर्के यांनी दिली.
यावेळी रूपाताई वायदंडे, अनिल धनवडे, संजय जिरगे, एस. पी. शेंडगे, पांडुरंग कुरुकलीकर, प्रवीण आजरेकर, अशोक घाडगे, आदी उपस्थित होते.