कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांतील दोन आणि तीन वर्षे कार्यकाळ पूर्ण झालेल्या आणि मूळ जिल्ह्यात वास्तव्य असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेरील बदल्यांचे गॅझेट आज, गुरुवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पाचही जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांची बुधवारी बैठक घेऊन निवडणूक आढाव्यासह प्रशासकीय बदल्यांची माहिती घेतली. कोणाची वर्णी कुठे लागणार याबाबत अधिकाºयांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.कोल्हापूर परिक्षेत्रात दोन व तीन वर्षे पूर्ण झालेल्या पोलीस उपअधीक्षक, निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे गॅझेट दोन दिवसांत निघण्याची शक्यता आहे. परिक्षेत्रातील बदली अधिकाऱ्यांच्या सेवेची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांनी बुधवारी घेतली. तसेच निवडणुकीच्या बंदोबस्ताच्या तयारीची माहिती घेत मार्गदर्शन केले.
परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यांत १४६ पोलीस ठाणी आहेत. येथील संभाव्य अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. आपली हक्काच्या व सोईच्या ठिकाणी वर्णी लागावी, यासाठी बदलीची चाहूल लागलेले अधिकारी गेल्या चार दिवसांपासून दादा, साहेबांच्या भोवती तळ ठोकून आहेत.