सडोली (खालसा) : वाशी बिरदेव वार्षिक यात्रेच्या पहिल्या दिवशी भानुस मंदिरातून मुख्य मंदिरामध्ये देव जात असताना रानगे आणि पुजारी यांच्यामध्ये मानपानावरून पालखी सोहळ्या दरम्यान बाचाबाची झाली. याचे पडसाद दगडफेकीत झाले.यामध्ये मानकरी उदयानीदेवी साळुंखे यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. दोन्ही गटांनी तक्रारी दिल्याने करवीर पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. या घटनेचा यात्रेवर कोणताही परिणाम होणार नसून यात्रा सुरळीत पार पाडली जाईल अशी माहिती यात्रा अध्यक्ष सरपंच शिवाजी जाधव यांनी दिली आहे.वाशी ता.करवीर येथील चार राज्यातील भाविक भक्ताचे श्रध्दास्थान असलेल्या बिरदेव वार्षिक यात्रेला कालपासून सुरुवात झाली. भानुस मंदिरातून देव मुख्य मंदिरामध्ये नेऊन यात्रेला सुरुवात होते. हा पालखी सोहळा काही अंतरावर गेल्यानंतर रानगे आणि पुजारी या दोन गटातील काही मंडळींमध्ये पालखी जवळ थांबण्याचा मान व भंडारा उधळण्याचा मान घेण्यासाठी बाचाबाची झाली. दोन्ही गटात गेल्या कित्येक वर्षापासून हा वाद सुरु आहे.दरम्यान, काल पालखी सोहळा जात असताना हा वाद पुन्हा उफाळून आला त्याचे पडसाद वादाला कारण ठरले. हा प्रकार मिटवण्यासाठी गावातील प्रमुख मंडळींनी प्रयत्न केले मात्र ते अपयशी ठरल्याने या दोन्ही गटातील मंडळींनी परस्परविरोधी तक्रार दिल्याने करवीर पोलिसांत गुन्हे दाखल झाले आहेत. यात्रेच्या पहिल्या दिवशीच वादाचा प्रकार घडल्यानं मंदिर परिसरामध्ये शुकशुकाट होता.
Kolhapur Crime: वाशीत यात्रेतील मानपानावरुन दोन गटात राडा, परस्पर विरोधी गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 19:13 IST