सडोली (खालसा) : भारतीय संस्कृतीत सौभ्याग्याला मोठं महत्व आहे. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत करतात. आज वटपौर्णिमा असल्याने सकाळपासून महिलांनी वडाची पूजा केली. कोल्हापुरातील देवाळे (ता. करवीर) येथील विधवा महिलांनीही सर्व अनिष्ट प्रथाना मुठमाती देत वटपौर्णिमा साजरी केली. इतकच नाही तर सौभाग्याचे लेनं देखील परिधान केले. विधवा प्रथा बंदी जनजागृतीनंतर देवाळे गावच्या महिलांनी केलेल्या या बदलाचे सर्वच कौतुक होत आहे.शिरोळ तालुक्यातील हेरवाड गावाने क्रांतिकारक निर्णय घेत विधवा प्रथा बंदीचा ठराव केला. याची दखल शासनपातळीवर देखील घेण्यात आली. याबाबत आता सर्वच जनजागृती केली जात आहे. यानंतर आता लोकांमध्ये बदल देखील होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक गावात विधवा महिलांचा मान सन्मान केला जात आहे. देवाळे गावानेही २७ मे रोजी विधवा प्रथा बंदी करण्याचा ठराव मंजूर केला. अन् आजच्या वटपौर्णिमेदिवशीच या निर्णयाचा सकारात्मक बदल दिसून आला.गावातील पाच विधवा महिलांनी सुहासिनी प्रमाणे वटपौर्णिमा सण साजरा केला. महिलांनी घेतलेल्या या निर्णयाचे गावासह परिसरात कौतुक होत आहे. आनंदी युवराज कांबळे, सविता यशवंत देवाळकर, राजश्री कृष्णात देवाळकर, रचना राजेश भोसले, राणी दिपक चौगले या पाच जणींनी आज वडाच्या शेजारी एकमेकीला कुंकू लावून नवीन आयुष्याला सुरुवात केली. तसेच वडाला फेर्या मारून वडाची देखील पूजा केली. ग्रामपंचायत सदस्य गीता दिनकर कांबळे यांनी या महिलांची ओटी भरली.
कोल्हापूर: देवाळेत विधवा महिलांनी साजरी केली वटपौर्णिमा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 7:31 PM