कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा म्हैतर वाल्मीकी समाजाच्या वतीने समाजाचे आराध्य दैवत गुरू गोरखनाथजी यांचे शिष्य भगवान वीर गोगादेव यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येत आहे. त्या अंतर्गत एक सप्टेंबरपर्यंत होणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संभाजीनगर कामगार चाळीतील वीर गोगादेव यांच्या मंदिराजवळ हे सर्व कार्यक्रम होतील. एक सप्टेंबरला जन्मोत्सव सोहळा होईल ; परंतु त्यादिवशी काढण्यात येणारी मिरवणूक व महाप्रसाद ही रद्द करण्यात आल्याची माहिती उत्सव समितीचे हेमंत मोहन पटवणे, सुरेश अदिवाल, सुधीर रानवे, राजू चंडाळे, अमर वाघेला आदींनी दिली.
राजस्थानमध्ये वीर गोगादेव यांची समाधी आहे. या समाधी स्थळावरून २००४ साली संभाजीनगर कामगार चाळीमध्ये सासनकाठी आणण्यात आली. गोगादेव यांच्या मूर्तीसह सासनकाठीचे पूजन करून जन्मोत्सव सोहळा सुरु झाला आहे. रोज भाविकांच्या घरी सासनकाठी नेली जाईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त पाचच समाजबांधव सासनकाठी घरी नेण्याचे काम करतील. दिवसभर मंदिरात पूजा झाल्यानंतर रोज सायंकाळी ७ वाजता गोगादेव यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित भजने सादर केली जातात. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,पांजरपोळ संस्थेतील जनावरांना चारा वाटप, पंचगंगा स्मशानभूमीसाठी शेणी दान असेही उपक्रम राबविण्यात येत आहेत.
फोटो : १८०८२०२१-कोल-गोगोदेव उत्सव०२