एकनाथ पाटील -- कोल्हापूर -वाढती रहदारी, भरधाव वाहने, खराब व अरुंद रस्ते, वाहतुकीच्या नियमांच्या पालनाचा अभाव या सर्व समस्यांमुळे कोल्हापूर शहरात अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाविद्यालयीन तरुण धूम स्टाईलने वाहने वेगात चालवीत मृत्यूला आमंत्रण देत आहेत. पालकांचे दुर्लक्ष, शाळा-महाविद्यालयांत मार्गदर्शनाचा अभाव आणि वाहतूक पोलिसांची वाहतुकीच्या प्रश्नावर तात्पुरती मलमपट्टी अशा कारणांनी तरुणांचा हकनाक बळी जात आहे. सध्या अनेक परदेशी कंपन्यांच्या बाईक्सची तरुणांत क्रेझ आली आहे. दोन लाखांपासून १२ लाखापर्यंतच्या ३५० पासून १००० सीसी पर्यंतच्या प्रचंड क्षमतेच्या या गाड्या शहरातील रस्त्यावर सुसाट जात असल्याचे पहावयास मिळते. तसेच महाविद्यालयीन तरुण मोबाईलवर बोलत, रस्त्याने ये-जा करणाऱ्या तरुणींवर इम्प्रेशन पाडण्यासाठी धूम स्टाईलने बेशिस्तपणे वाहने चालविताना दिसतात. केवळ हलगर्जीपणामुळे लाखमोलाचा जीव तरुण पणास लावत आहेत. त्यांना वेळीच रोखण्यासाठी पालक किंवा पोलीस प्रयत्न करीत नसल्याचे दिसून येते. कोल्हापूर शहरातही अपुरे रस्ते व वाहनांची संख्या अवास्तव यामुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पार्किंग नसतानाही वाहने अस्ताव्यस्त उभी केली जातात. त्यामुळे वाहनधारकाला समोरच्या वाहनाला ओलांडून जाताना अपघाताला सामोरे जावे लागते. ही वाहने हटविण्याची महापालिका व शहर वाहतूक विभागाची जबाबदारी आहे; परंतु त्यांच्याकडून ही कारवाई होत नाही.‘सीपीआर’मध्ये ट्रामा केअर, मेंदू व तुटलेल्या रक्तवाहिन्यांवर उपचार करणारी यंत्रणा नसल्यामुळे अपघातातील गंभीर जखमीचा या ठिकाणी मृत्यूच होतो. शहरात रस्ते अपघातांवर नियंत्रण ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी शहर वाहतूक पोलिसांची आहे; परंतु प्रशिक्षणाचा तसेच साधनसामग्रीचा अभाव असल्याने हे पोलीस फक्त बघ्याचीच भूमिका बजावतात. वेगाला मर्यादा नाही शहरात वाढत्या लोकसंख्येमुळे वाहनधारकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. वाहतूक व्यवस्था म्हणजे शहरातील मोठी समस्या आहे. शहर वाहतूक पोलिसांच्या समोरून महाविद्यालयीन तरुण सायलेन्सर काढून मोटारसायकली सुसाट वेगाने चालवीत असतात. काही वेळा ट्रिपल सीटवरून बिनदिक्कतपणे फिरत असतात. हे चित्र नजरेसमोर असतानाही ते याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. शहरातील प्रत्येक वाहनाला वेगमर्यादा घालून दिली पाहिजे. मात्र वाहतूक पोलीस त्याबद्दल कोणतीच खबरदारी घेत नाहीत.सदोष अपघात स्थळे तावडे हॉटेल, मार्केट यार्ड, कावळा नाका, टेंबलाई उड्डाणपूल, मिलिटरी कॅम्प परिसर, शिवाजी विद्यापीठ रोड, सायबर चौक, एन. सी. सी. भवन, ध्यानचंद हॉकी स्टेडियम, संभाजीनगर चौक, कळंबा नाका, देवकर पाणंद चौक, क्रशर चौक, जुना वाशी नाका, फुलेवाडी नाका, शिवाजी पूल, कसबा बावडा ही सर्व ठिकाणे ‘सदोष अपघातस्थळे’ म्हणून घोषित केली आहेत. रिचार्जनंतर स्विच आॅफ शहरात गेल्या सात दिवसांपासून वाहतूक सप्ताहानिमित्त पोलिसांकडून वाहतुकीसंबंधी जनजागृती करण्याचे काम सुरू आहे. या सप्ताहामध्येच सायबर चौक येथे भरधाव वेगात वाहन चालविताना रस्ता दुभाजकाला मोटारसायकल धडकून यश शिवाजीराव चावरेकर या तरुणाचा हकनाक बळी गेला. वाहतूक पोलीस फक्त सप्ताह कालावधीत ‘रिचार्ज’ होतात आणि सप्ताहानंतर मात्र ते ‘स्विच आॅफ’ होताना दिसतात.स्थानिक स्वराज्य संस्थांनी शंभर टक्केपायाभूत सुविधा दिल्या, तर अपघातांचे प्रमाण कमी करता येईल. प्रत्येक व्यक्तीने वाहतुकीचे नियम, शिस्त पाळल्यास अपघात टाळता येतील. - आर. आर. पाटील, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखास्पीड ब्रेकरांसह दिशादर्शक फलकांचा अभावशहरात काही रस्त्यांवर स्पीड ब्रेकर आहेत; परंतु पुढे स्पीड ब्रेकर आहे, चौक आहे, अशी सूचना देणारे फलक लावलेले नाहीत; तर काही ठिकाणी स्पीड ब्रेकर नसल्याने वाहने सुसाट जात असतात. अशावेळी चौकामध्ये रस्ता ओलांडताना अपघाताला सामोरे जावे लागते. संभाजीनगर ते क्रशर चौक मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहने भरधाव जात असतात. या दोन्ही मार्गांच्या मध्ये देवकर पाणंद चौक लागतो. त्यातून देवकर पाणंद पेट्रोल पंपाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना दोन्ही बाजूंना पाहूनच रस्ता ओलांडावा लागतो. या दोन्ही बाजूंना चौकामध्ये स्पीड ब्रेकर करण्याची फार गरज आहे.वाहतूक सुरक्षेबाबत उपाय योजनेची गरजवाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजेनियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे.वाहतुकीची स्वयंशिस्त पाळली पाहिजे. वाहतुकीच्या नियमांचे स्वत:च्या घरापासून पालन केले पाहिजे.प्रत्येकाने वाहनाची वेगमर्यादा सांभाळली पाहिजे. सध्या तरुणाई धूम स्टाईलने दुचाकी वाहने चालवीत आहे. त्यामुळे महाविद्यालयात त्यांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे.
वेगाच्या नशेला लावा ब्रेक
By admin | Published: January 18, 2016 12:13 AM