लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : जिल्ह्यात गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. आवक स्थिर असली तरी मागणी वाढल्याचा परिणाम दिसत आहे. ऐन सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात तेजी आली असून घाऊक बाजारात साखर ३७५० रुपये क्विंटल दर आहे. फळ मार्केटमध्ये सफरचंद, मोसंबी, पेरू आदी फळांची रेलचेलच दिसत आहे.
महापूर आणि अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याच्या आवकेवर काहीसा परिणाम झाला हाेता. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून कोल्हापुरात भाजीपाल्याची आवक वाढली आहे. कोबी, वांगी, टोमॅटो, ढब्बू, गवार, दोडक्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक थोडी वाढली असली तरी दरात मात्र वाढ झाली आहे. श्रावणामुळे भाज्यांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी दरातही वाढ झाली आहे. कोबी, वांगी, ओली मिरची, ढब्बू, गवार, कारली, भेंडक्ष, दाेडका या भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. घेवडा, वरणा, प्लॉवर या भाज्यांच्या दरात फारशी चढउतार दिसत नाही. मका कणसाची आवक वाढली असून घाऊक बाजारात ४०० रुपये शेकडा आहे. कोथिंबीरची आवक वाढली, मात्र मागणी कमी असल्याने किरकोळ बाजारात पाच रुपये पेंढी आहे. मेथी, पोकळ्याचे दर काहीसे कमी झाले असून पोकळा व शेपूच्या दरात वाढ दिसत आहे. फळ मार्केटमध्ये लिंबू, पेरू, सफरचंद, मोसंबी, डाळिंब, केव्ही, केळी या फळांची आवक चांगली आहे. उपवासामुळे फळांना मागणीही चांगली आहे. कडधान्य मार्केटमध्ये तूरडाळ व हरभरा डाळीला काहीसी तेजी आहे. हरभरा डाळ ७५ रुपये किलोवर गेली असून तूरडाळ ११० रुपयांवर आहे. किरकोळ बाजारात सरकी तेल १६० रुपये किलो आहे. साखरेच्या दरात वाढ होत असून घाऊक बाजारात ३७५० रुपये क्विंटलचा दर आहे.
ओल्या वाटाण्याची शंभरी पार
ओल्या वाटाण्याची मागणी वाढली असली तरी कोल्हापुरात आवक फारच कमी आहे. त्यामुळे घाऊक बाजारात ७५ रुपये किलो असणारा वाटाण्याने किरकोळ बाजारात मात्र शंभर पार केली आहे.
महापुरानंतर पहिल्यांदाच मार्केट तेजीत
कोरोनाची दुसरी लाट, त्यात महापुराचे संकटामुळे मार्केट काहीसे शांत झाले होते. मात्र सध्या सणासुदीमुळे कडधान्यासह सर्वच मार्केटमध्ये तेजीत आहेत. मार्केटमध्ये ग्राहकांची रेलचेल पहावयास मिळत आहे.
फोटो ओळी : कोल्हापुरात रविवारी मोसंबी, डाळिंब, सफरचंद या फळांची आवक मोठ्या प्रमाणात झाली होती. (फोटो-२२०८२०२१-कोल-बाजार, बाजार०१ व बाजार०२) (छाया- नसीर अत्तार)