कोल्हापूर : कोरोनाच्या अनुषंगाने लक्ष्मीपुरीचा परिसर हा अतिजोखमीचा असल्याचा इशारा भारतीय वैद्यकीय संस्थेने दिल्यानंतर लागलीच या परिसरातच रस्त्यांवर भरणारी भाजी मंडई गुरुवारी महानगरपालिका प्रशासनाने हटविली. येथे बसणाऱ्या सुमारे दोनशेवर भाजी व फळ विक्रेत्यांना आता शहरात अन्यत्र व्यवसाय करावा लागणार आहे.देशभरात कोरोना संसर्ग वाढत जाईल तसे कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाने काही नियम केले आणि त्यांची अंमलबजावणी सुरू केली. लक्ष्मीपुरी बाजारपेठेत रवी बँकेच्या ठिकाणी भरणारी भाजी मंडई संसर्गाच्या भीतीमुळे लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे ते फोर्ड कॉर्नर आणि उमा टॉकीज या रस्त्यांवर आणली.
या दोन्ही रस्त्यांवर सुमारे दोनशेहून अधिक फळ तसेच भाजी विक्रेते व्यवसाय करीत होते. त्यांना दुपारी कधी तीन वाजेपर्यंत, तर कधी पाच वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली. दोन महिने ही मंडई रस्त्यावरच भरत होती; परंतु त्या परिसरात खूप गर्दी होऊ लागली.