जयसिंगपूर : शहरात फिरून भाजीपाला विक्री करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तरीही काही विक्रेत्यांकडून डेबॉन्स कॉर्नर ते नांदणी नाक्याकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात विक्रेते भाजी विक्रीसाठी गाडा लावून बसत आहेत. त्यामुळे अशा भाजी विक्रेत्यांना पालिकेने सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे.
शहरात कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. त्यामुळे दहावी ते बारावी गल्लीमध्ये विक्रीसाठी बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना हटविण्यात आले होते. तसेच तेथील परिसर सील केला आहे. त्याचबरोबर बसून भाजीविक्री न करता फिरून भाजीविक्री करण्याबाबतचे आवाहन केले होते. मात्र, काही भाजी विक्रेते नांदणी रोडवर गाडे लावून भाजी विक्रीसाठी बसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यातच विक्रीसाठी भाजीविक्रेते बसत असल्याने भाजी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका नाकारता येत नाही. तरी नांदणी मार्गावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना प्रशासनाने सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे.