कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला कोल्हापुरात थेट ग्राहकाला पोहोच करण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे. शनिवारपासून हा पुरवठा सुरू करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यासंदर्भात गुरुवारी शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळामध्ये बैठक झाली. त्यास अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख पंडित पोवार व भाजपचे किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे प्रमुख उपस्थित होते.
गेल्या रविवारपासून कडक लॉकडाऊन सुरू असल्याने भाजीपाला विक्री बंद आहे. महापालिकेने या काळात भाजीपाला घरपोहोच देण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. परंतु मुळात मार्केट यार्डातच भाजीपाला आवक होत नसल्याने घरोघरी कुठला भाजीपाला पोहोच करणार, असा पेच तयार झाला आहे. त्यातून मार्ग काढण्याची सूचना अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी केली होती. त्यानुसार पोवार यांनी भगवान काटे यांच्याशी चर्चा केली व यातून काय मार्ग काढता येईल, अशी विचारणा केली. त्यानुसारच या बैठकीचे नियोजन करण्यात आले. बैठकीस सुजित चव्हाण, श्रीकांत भोसले, सुरेश जरग आदींसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. शिरोळमध्ये भाजीपाल्यास ग्राहक नाही म्हणून तो रस्त्यावर फेकून द्यायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधून सर्वप्रकारचा चांगल्या दर्जाचा भाजीपाला टेम्पोमधून कोल्हापुरात आणायचा व मागणीनुसार तो त्या त्या भागातील तरुण मंडळांकडे पोहोच करायचा, असे नियोजन आहे. मंडळांनी भाजीपाला आपापल्या भागातील लोकांच्या घरपोहोच करावा असा प्रयत्न आहे. त्यातून शेतकऱ्यालाही चांगले पैसे मिळतील व ग्राहकालाही ताजा व चांगल्या प्रतीचा भाजीपाला उपलब्ध होईल.