कोल्हापूर : शेतकरी संपाच्या पहिल्याच दिवशी कोल्हापुरात बाहेरून येणाऱ्या शेतमालामध्ये घट झाली. स्थानिक भाजीपाला जरी उपलब्ध झाला असला तरी उद्या, शनिवारपासून या संपाची तीव्रता जाणवण्याची शक्यता आहे. एकीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपल्या संघाचे दूध संकलन बंद केले आहे; तर दुसरीकडे पोलीस बंदोबस्तात गोकुळ आणि वारणा दूध संघांचे दूध टॅँकर पुण्या-मुंबईकडे रवाना झाले आहेत. शेतकरी संपाची उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत कोल्हापुरात कमी तीव्रता आहे. या संपास स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला असला तरी ती थेट उतरलेली नाही. हा संप मोडून काढण्याचा प्रयत्न झाल्यास स्वाभिमानी रस्त्यावर उतरेल, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. कोल्हापूर बाजार समितीमध्ये सकाळी साडेअकरापर्यंत भाजीपाल्याचे सौदे संपले होते. त्यानंतर शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते बाराच्या सुमारास या ठिकाणी आले. यावेळी त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. टोमॅटोच्या काही गोण्याही रस्त्यावर फेकल्या. शेतमालाला रास्त भाव मिळावा, स्वामिनाथन शिफारशी लागू करा, संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे, ६० वर्षांवरील शेतकऱ्यांना पेन्शन द्या अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. पी. डी. पाटील, माणिक शिंदे, अजित पाटील, टी. आय. पाटील, दादू कामिरे, गुणाजी शेलार, ज्ञानदेव पाटील, विलास मास्तर, उत्तम पाटील यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. दुपारच्या सुमारास किसान सभेच्या कार्यकर्त्यांनीही जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निवेदन देऊन कर्जमाफीची मागणी केली. गेल्या दोन दिवसांतील भाजीपाला सकाळी बाजार समितीत आला व सौदे झाले. आज, शुक्रवारी सौदे बंद राहणार आहेत. यानंतर या संपाची तीव्रता वाढली तर उद्या, शनिवारपासून कोल्हापूर परिसरात भाजीपाल्याची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. ............................अहमदनगर, नाशिककडून येणाऱ्या कांद्यामध्ये घटकोल्हापूरच्या बाजार समितीमध्ये प्रामुख्याने अहमदनगर, नाशिक येथून कांदा आवक होते. ३१ मे रोजी बाजार समितीमध्ये ९९६४ क्विंटल कांदा आला; तर आज १ जूनला ३१२५ क्विंटल आवक झाली. येथे इंदूर आणि आग्रा येथून बटाटा येतो. बटाट्याची बुधवारी २१३७ क्विंटल तर गुरुवारी १ हजार ३६ क्विंटल आवक झाली. भाजीपाल्याची आवक मात्र २२४० क्विंटलवरून १७७७ क्विंटलपर्यंत खाली घसरली. बाजार समितीचे उपसचिव मोहन सालपे यांनी ही माहिती दिली. .........................पोलीस बंदोबस्तात दूध रवानाकोल्हापूर जिल्"ातील गोकुळ आणि वारणा दुधाचे पुणे आणि मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर वितरण होते. त्यामुळे ‘गोकुळ’चे २५ टँकर आणि वारणा दुधाचे १५ टँकर दिवसभरामध्ये पोलीस बंदोबस्तात पुणे-मुंबईकडे रवाना करण्यात आले. .........................‘गोकुळ’चे संकलन नेहमीप्रमाणे झाले आहे. काही ठिकाणी किरकोळ प्रमाणात संकलन झाले नाही. मात्र, दिवसभरामध्ये ५ लाख लिटर दूध मुंबईकडे पाठविण्यात आले. आम्ही पोलीस प्रशासनाकडे बंदोबस्ताची मागणी केली होती. त्यानुसार तो पुरवण्यात आला आहे. त्यामुळे २५ टँकर दूध घेऊन रवाना झाले आहेत. - डी. व्ही. घाणेकर,कार्यकारी संचालक, गोकुळसंकलन सुरू ठेवणारगुरुवारी गोकुळ व वारणा दूध संघाच्या संकलनावर फारसा परिणाम झाला नाही. काही ठिकाणी संपामुळे शेतकऱ्यांनीच स्वत:हून दूध न घातल्याने १० टक्के संकलन कमी झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. या दोन्ही संघांनी आज, शुक्रवारी संकलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजीपाल्यांची आवक कोल्हापुरात घटली
By admin | Published: June 02, 2017 1:00 AM