कोल्हापूर : व्हिनस कॉर्नरजवळील गाडीअड्डा येथील वाहनतळाच्या जागेचे सपाटीकरण सुरू झाले असून, या कामाची शुक्रवारी महापौर सूरमंजिरी लाटकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. १ डिसेंबरपासून सदरचे वाहनतळ सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या; मात्र अद्याप त्याची कार्यवाही झालेली नाही.महानगरपालिकेतर्फे गाडीअड्डा येथे पर्यटकांसाठी व नागरिकांसाठी वाहनतळ सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत महापौर लाटकर यांनी आदेश दिले होते. शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयामार्फत येथील वाहनतळ जागेचे मुरूम टाकू न सपाटीकरण करण्यात येत आहे. क्रीडाईच्या वतीने वाहनतळाचे डिझायनिंग करण्यात आले असून, हा परिसर डेव्हलप करण्यासाठी त्यांची मदत घेतली जात आहे.महापौर लाटकर व उपमहापौर संजय मोहिते यांनी शुक्रवारी वाहनतळाची पाहणी केली. यावेळी महापौरांनी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना या परिसरातील उर्वरित ठिकाणची वाहने हटवून पूर्णपणे सपाटीकरण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच व्हीनस कॉर्नर येथून प्रवेश देऊन टायटन शोरूमच्या पाठीमागील बाजूने बाहेर जाण्याचा मार्ग करण्याच्या सूचना दिल्या.यावेळी क्रिडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी महापौरांना या ठिकाणी केलेले वाहनतळाचे संकल्पचित्र दाखविले. उपमहापौर मोहिते यांनी पर्यटकांना माहितीसाठी कावळा नाका येथून वाहनतळाचे फलक लावण्याच्या सूचना दिल्या. तसेच या ठिकाणी पर्यटकांची गाडी लावल्यानंतर त्यांना अंबाबाई मंदिरापर्यंत के. एम. टी.ची व्यवस्था ठेवण्याच्या सूचना दिल्या. यावेळी के. एम. टी.चे प्रकल्प अधिकारी पी. एन. गुरव, रियाज सुभेदार उपस्थित होते.