कोल्हापूरात ध्वनियंत्रणेसह वाहने जप्त, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कारवाई : मालक, वाहनचालकांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 01:46 PM2018-09-14T13:46:14+5:302018-09-14T13:51:33+5:30
गणेश आगमनासाठी ध्वनियंत्रणा घेऊन जाणाऱ्या ध्वनियंत्रणेचे मालक, वाहनचालक यांच्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह राजारामपुरी, करवीर पोलिसांनी विविध ठिकाणी कारवाई करून अटक केली. त्यांच्याकडून ध्वनियंत्रणेसह बस, वाहने असा सुमारे सहा लाख रुपयांचे साहित्य जप्त केले.
कोल्हापूर : गणेश आगमनासाठी ध्वनियंत्रणा घेऊन जाणाऱ्या ध्वनियंत्रणेचे मालक, वाहनचालक यांच्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह राजारामपुरी, करवीर पोलिसांनी विविध ठिकाणी कारवाई करून अटक केली. त्यांच्याकडून ध्वनियंत्रणेसह बस, वाहने असा सुमारे सहा लाख रुपयांचे साहित्य जप्त केले.
याप्रकरणी संशयित ध्वनियंत्रणेचे मालक प्रदीप शिवाजी गायकवाड (रा. वर्षानगर, कोल्हापूर) व टेम्पोचालक सर्जेराव बळवंत पाटील (रा. निगवे खालसा, ता. करवीर) आणि सुजित कृष्णा कारंडे यांना अटक केली.
पोलिसांनी ध्वनियंत्रणा व बेसवर गुरुवारी कारवाई करून ती जप्त केली.
पोलिसांनी सांगितले की, ध्वनियंत्रणेवर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पथक स्थापन केले. त्यानुसार गुरुवारी आयसोलेशन हॉस्पिटल समोरील रस्त्यावरून टेम्पोचालक सर्जेराव पाटील हा ध्वनियंत्रणा घेऊन जात होता. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक सचिन पंडित यांनी त्याला पकडले. त्याच्या ताब्यातील चार बेस टॉप, मिक्सर, वायर केबल, ताडपदरी व टेम्पो जप्त केला.
करवीर पोलीस गुरुवारी ध्वनियंत्रणा नेत असताना.
याप्रकरणी पाटील व ध्वनियंत्रणेचे मालक प्रदीप गायकवाड यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर फौजदारी संहिता १९७३ चे कलम १४४ (१) आदेशाचा भंग केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांत गुन्हा दाखल केला. याबाबत पोलीस नाईक रणजित कांबळे यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी या सर्वांना अटक करण्यात आली आहे.
याचप्रमाणे ध्वनियंत्रणा नेत असताना संशयित टेम्पोचालक सुजित कृष्णा कारंडे याला पकडले. त्याच्याकडील चार बेस, तीन टॉप जप्त केले. याचबरोबर जुना राजवाडा व करवीर पोलीस ठाणे अंतर्गत अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली. करवीर पोलिसांनी ध्वनियंत्रणा व बस असे सुमारे तीन लाखांचे साहित्य जप्त केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
श्री ग्रुपबॉईज अध्यक्षांसह आठ जणांवर गुन्हा; पाच लाखांची ध्वनियंत्रणा जप्त
बुधवारी (दि. १२) रात्री रामानंदनगर - पोवार कॉलनी येथील श्री ग्रुप बॉईज मंडळाची गणेशमूर्ती आणताना ट्रॅक्टर-ट्रॉलीवर ध्वनियंत्रणा लावली होती. याप्रकरणी करवीर पोलिसांनी चार लाख ८५ हजार रुपयांचे ध्वनियंत्रणेचे साहित्य जप्त केले.
याप्रकरणी मंडळाचा अध्यक्ष संशयित प्रसाद रघुनाथ हांडे, उपाध्यक्ष ओंकार बाळू पाटील, खजानिस सौरभ कांबळे, सचिव तुषार पाटील (सर्व रा. रामानंदनगर, कोल्हापूर), ध्वनियंत्रणाचा मालक अभिजित दिलीप माने (रा. कदम गल्ली, उचगाव), आॅपरेटर अविराज जाधव, ट्रॅक्टरचालक बसू आण्णाप्पा शिंत्रे (रा. सौंदत्ती, बेळगाव) यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सुनील पाटील व पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील, सहायक फौजदार रमेश ठाणेकर, सुहास पाटील, किरण वावरे, दीपक घोरपडे, सागर कांडगावे, नंदगावकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.