लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शहरातील दूध विक्रेत्यांना त्यांच्या जागेवर बसूनच दूध विक्री करता येणार आहे, याबाबत प्रशासनाने संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या आहेत. ‘गोकुळ’ने यासाठी सोमवारी पाठपुरावा केल्याने विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. यामधून दूध व मेडिकल सेवेला वगळण्यात आले आहे. मात्र, रविवारी व सोमवारी शहरातील दूध विक्रेत्यांना घरपोच दूध विक्री करण्याची सक्ती महापालिका व पोलीस यंत्रणेने केली. यातून विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाईही केली आहे. एका विक्रेत्याकडे साधारणत: ३०० ते ११०० लीटरपर्यंत दूध असते. ते प्रत्येकाच्या घरी जाऊन देणे तेही वेळेत शक्य होणार नाही. त्यामुळे एकाच ठिकाणी बसून ग्राहक येईल, तशी दूध विक्री केली जाते. मात्र, त्यावर महापालिका यंत्रणेने हरकत घेतली आणि कारवाई सुरू केल्याने विक्रेते हवालदिल झाले होते.
सोमवारी ‘गोकुळ’तर्फे पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हा प्रशासनाच्या ही बाब निदर्शनाला आणून दिली. यावर तातडीने कार्यवाही करताना प्रशासनाने एकाच जागेवर बसून दूध वितरण करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे.
शहरातील विक्री १० हजारने घटली
कोल्हापूर शहरातील चहा स्टॉल, कार्यालये बंद असल्याने दुधाची मागणी कमी झाली आहे. सोमवारी दहा हजार लीटरने विक्री घटली.
कोट-
कोल्हापूर शहरातील विक्रेत्यांवर कारवाई झाली होती. जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनाला वस्तूस्थिती आणून दिल्यानंतर पूर्वीप्रमाणे दूध विक्री करण्यास परवानगी दिली.
- विश्वास पाटील (अध्यक्ष, गोकुळ)