कोल्हापूर : येथील महापालिकेतर्फे शहरात सुरू करण्यात आलेल्या १५ कोविड काळजी केंद्र आणि शहरातील ६४ रुग्णालयांतील व्हेंटिलेटर बेड सध्या फुल आहेत. शहरातील व्हेंटिलेटरचे एकूण १६३ बेड पूर्ण क्षमतेने भरली आहेत. परिणामी, गरजू रुग्णांची हेळसांड होत आहे. यामुळे व्हेंटिलेटरची गरज असलेल्या रुग्णांना तडपडत राहावे लागत आहे. नाइलास्तव डॉक्टर संबंधित रुग्णास ऑक्सिजन लावून जगवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या रोज दोन हजारांवर आहे. आरोग्य सुविधांवर प्रचंड ताण आला आहे. जिल्ह्यासह लगतचे जिल्हे, कोकण आणि सीमा भागातील रुग्णही उपचारासाठी येथील रुग्णालयांत दाखल होत आहेत. यामुळे महापालिका आणि खासगी रुग्णालयातील व्हेंटिलेटर बेड पूर्ण क्षमतेने भरली आहेत. सद्य:स्थितीत व्हेंटिलेटर न लावल्यास रुग्णांचा जीव जाणार, अशी स्थिती असल्यास डॉक्टरांनाही धावपळ करावी लागते आहे. ते व्हेंटिलेटरऐवजी ऑक्सिजनच्या बेडवर उपचार करून संबंधित रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यामुळेच महापालिका, जिल्हा आरोग्य आणि जिल्हा प्रशासन कोरोना संशयितास पहिल्या टप्प्यातच शोधून उपचारासाठी दाखल करण्यावर भर देत आहे. यासाठीच घराघरात जाऊन ज्येष्ठ नागरिक आणि विविध व्याधीग्रस्त लोकांचा आरोग्यविषयक सर्व्हे केला जात आहे.
आकडे बोलतात
खासगी रुग्णालयातील कोरोनावर उपचार करणाऱ्या बेडची एकूण संख्या : १९७२
शिल्लक बेड : २६९
ऑक्सिजनच्या बेडची संख्या : १०२१, शिल्लक : ६५
आयसीयूच्या बेडची संख्या : ३१९, शिल्लक : १९
व्हेंटिलेटर बेडची संख्या : १५३, शिल्लक : ०
महापालिकेच्या कोविड केंद्रातील सद्य:स्थिती :
ऑक्सिजन बेडची संख्या : २९५, शिल्लक : ३९
व्हेंटिलेटर बेडची संख्या : १०, शिल्लक : ०
चौकट
परवाना बंधनकारक
शहरात कोविड काळजी केंद्र सुरू करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. परवानगी न घेता केंद्र सुरू करणे गुन्हा आहे. विना परवाना केंद्र सुरूच होऊ नये, याकडे प्रशासन कटाक्षाने लक्ष ठेवून आहे. दरम्यान, महापालिकेतर्फे चालवली जाणारी १३ आणि स्वयंसेवी संस्थातर्फे चालवण्यात येत असलेल्या दोन्ही कोविड काळजी केंद्रांत चांगल्या आरोग्य सुविधा मिळत असल्याचा दावा प्रशासनाचा आहे.
कोट
रुग्णांची संख्या वाढल्याने महापालिका कोविड केंद्र आणि शहरातील इतर रुग्णांलयातील व्हेंटिलेटर बेड फुल आहेत; पण ऑक्सिजनचे बेड पुरेशा प्रमाणात आहेत. दरम्यान, कोरोना संशयितांनी पहिल्या टप्प्यातच चाचणी करून घेऊन पॉझिटिव्ह असल्यास उपचारासाठी दाखल व्हावे. कोणत्याही परिस्थितीत विलंब लावू नये. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर लावण्याची वेळ येण्याइतपत दुुर्लक्ष करू नये.
-रविकांत आडसूळ,
उपायुक्त, महापालिका