कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील (सीपीआर) अत्यवस्थ कोरोना रुग्ण असणाऱ्या ट्रॉमा केअर सेंटरला सोमवारी पहाटे साडेतीन वाजता शॉर्टसर्किटमुळे आग लागली. एका रुग्णाला लावलेल्या व्हेंटिलेटरने अचानक पेट घेतल्यामुळे रुग्णालयात प्रचंड गोंधळ उडाला. या कक्षातील अत्यवस्थ असलेल्या १५ रुग्ण अन्य विभागांत तत्काळ स्थलांतर करुन व्हेंटिलेटर जोडेपर्यंत दोन रुग्णांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. मृतांची नावे समजू शकलेली नाहीत.
पहाटे साडेतीनच्या सुमारास वेदगंगा बिल्डिंगच्या तळमजल्यावर असलेल्या ट्रामा केअर कक्षात आग लागली. तेथे अत्यवस्थ रुग्णांवर उपचार सुरू होते. नऊ रुग्ण व्हेंटिलेटरवर तर सहा आॅक्सिजनवर होते. एका रुग्णाला लावलेल्या व्हेंटिलेटरमधून अचानक धूर यायला सुरुवात झाली. काही क्षणांत त्याने पेट घेतला आणि रुग्णालयात गोंधळ उडाला. ड्युटीवर असलेल्या डॉक्टर्स, नर्स, वार्डबॉय, सुरक्षा जवानांनी तत्काळ पेटलेल्या व्हेंटिलेटरचा आॅक्सिजन व वीजपुरवठा बंद केला. मात्र, तोपर्यंत कक्षात मोठ्या प्रमाणात धूर साचला होता. रुग्णांना अन्य ठिकाणी स्थलांतर करण्यास सुरुवात केली. अग्निशमन दलाचे जवान पोहोचेपर्यंत सात, आठ रुग्णांना बाहेर काढण्यात आले होते.