सुनील चौगले, लोकमत न्यूज नेटवर्क
आमजाई व्हरवडे : ‘गोकुळ’च्या राजकारणाचा पहिला भूकंप राधानगरी तालुक्यात झाला असून, गेली पन्नास वर्षे एकसंध असणारे घोटवडे येथील डोंगळे कुटुंबात उभी फूट पडली आहे. या फुटीला अरुण डोंगळे यांचे बंड कारणीभूत असले तरी कुटुंबांतर्गत वादाची किनारही पाहावयास मिळते. यामुळे राधानगरी तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार असून, शह काटशहाचे राजकारण म्हणून सत्तारूढ गटाकडून ‘गोकुळ’चे माजी संचालक स्वर्गीय विजयसिंह डोंगळे यांच्या पत्नी भारती डोंगळे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
गेली पन्नास वर्षे रंगराव डोंगळे, विजयसिंह डोंगळे व अरुण डोंगळे यांच्या रूपाने ‘गोकुळ’मध्ये डोंगळे कुटुंबीय कार्यरत आहे. अरुण डोंगळे हे तब्बल तीस वर्षे संचालक मंडळात आहेत. विजयसिंह डोंगळे व अरुण डोंगळे यांनी ‘गोकुळ’चे राजकारण ताकदीने केलेच, त्याचबरोबर ‘भोगावती’ साखर कारखान्यासह राधानगरी तालुक्याच्या राजकारणावर पकड निर्माण केली. अरुण डोंगळे हे ‘गोकुळ’मध्ये राहिले तर विजयसिंह डोंगळे यांनी सुपुत्र धीरज डोंगळे यांना ‘भोगावती’च्या राजकारणात आणून ताकद भक्कम करण्याचा प्रयत्न केला. विजयसिंह यांच्या निधनानंतर डोंगळे घराण्यातील अंतर्गत धूसफुस सुरू झाली आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अरुण डोंगळे यांनी त्यांचे सुपुत्र अभिषेक यांना राजकीय प्रवाहात सक्रिय केले आणि येथेच डोंगळे घराण्यातील संघर्षाची पहिली ठिणगी पडली.
अरुण डोंगळे यांची विधानसभा निवडणूक लढवण्याची महत्त्वाकांक्षा बऱ्याच वर्षांपासून होती. त्यातूनच २००४ ला सांगरूळ मतदार संघातून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न केले होते. त्यानंतर २०१९ ला ‘राधानगरी’ मधून त्यांनी शड्डू ठोकला. ‘गोकुळ’च्या मल्टीस्टेटच्या मुद्यावरून डोंगळे यांनी उघड विरोध केला होता. यावरून डोंगळे यांना पंधरा हजार मतेही मिळणार नाहीत, अशी बोचरी टीका माजी आमदार महादेवराव महाडीक यांनी केली होती. यानंतर डोंगळे व महाडीक यांच्यात दरी निर्माण झाली आणि येथेच सत्तारूढ गटापासून फारकत घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत मेळावा घेऊन त्यांच्या नेतृत्वाखाली ‘गोकुळ’ निवडणूक लढवण्याची घोषणा केली. यामुळे सत्तारूढ गटातील घडामोडी वेगावल्या आणि त्यांच्या भावजय भारती विजयसिंह डोंगळे यांना रिंगणात उतरण्याची तयारी सत्तारूढ गटाने केली. भारती डोंगळे या स्वर्गीय महिपतराव बोंद्रे यांच्या कन्या तर आमदार पी. एन. पाटील यांच्या मेहुण्या आहेत.
राधानगरी तालुक्यातील ४५८ ठराव आहेत, यामध्ये अरुण डोंगळे यांना मानणारे सुमारे दीडशे आहेत तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांना मानणारे १२५ ठराव आहेत. या दोन्ही नेत्यांकडे ६० टक्के ठराव असल्याने सत्तारुढ गटाची दमछाक होणार, हे निश्चित आहे.
चौकट
सत्तारुढ आघाडीतून चौगले की कौलवकर
राधानगरीतून विद्यमान संचालक पी. डी. धुंदरे व भारती डोंगळे यांची उमेदवारी निश्चत मानली जाते. तिसरी जागा घेऊन तिथे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष हिंदूराव चौगले की ‘भोगावती’चे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर यांच्या नावाची चाचपणी सुरू आहे. तिन्ही जागा ‘भोगावती’ काठावर दिल्या तर पॅनेलचा समतोल साधणार का? ही सत्तारूढ गटाची डोकेदुखी आहे.
दूध संकलन कमी व मतदारच जास्त!
करवीर पाठोपाठ राधानगरी तालुक्यात मतदार संख्या जास्त आहे. ४५९ मतदार संख्या असूनदेखील केवळ ६० हजार लिटर प्रतीदिन संकलन आहे. त्यामुळे दूध संकलन कमी व मतदार संख्या जास्त, असे चित्र आहे.
राष्ट्रवादीकडून ‘चौगले’, ‘फिरोजखान’ इच्छुक
विरोधी आघाडीकडून राधानगरी तालुक्यातून प्रा. किसन चौगले व माजी संचालक फिरोजखान पाटील इच्छुक आहेत. ‘गोकुळ’मध्ये सत्तांतर करायचे असल्यास ताकदवान उमेदवार रिंगणात उतरवण्याची व्यूहरचना पालकमंत्री सतेज पाटील व मंत्री हसन मुश्रीफ यांची आहे. त्यातूनच ए. वाय. पाटील किंवा त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी निवडणूक लढवावी, असा प्रयत्न असून, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचाही त्यासाठी दबाव वाढत आहे; मात्र ‘ए. वाय.’ यांची उमेदवारीबाबत मानसिकता दिसत नाही.
कोट
लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. अनेक ठिकाणी अनेकांच्या घरात वाद हा असतोच, त्यामुळे आमच्या घरातील फुटीवर जास्त काहीच बोलणार नाही.
- अरुण डोंगळे
मी आमदार पी. एन. पाटील यांचे नेतृत्व मानून काम करणारा कार्यकर्ता आहे. जर अरुण डोंगळे हे आमदार पाटील यांचे नेतृत्व मानून काम करणार असतील तर आमच्यात फूट होण्याचे कारण नाही. त्यांनी वेगळा विचार केला असेल तर तो आपणास मान्य नाही.
- धीरज डोंगळे.