अर्जुनवाड (जि. कोल्हापूर) : कृष्णा नदीच्या सन २००५ व २०१९ च्या महापुरातील सर्व बाबींचा विचार करता केंद्रीय जल आयोगाच्या अर्जुनवाड, कुरुंदवाड केंद्रांना महापुरातील अतिमहत्त्वाची केंद्रे म्हणून दर्जा मिळाला आहे. कृष्णा नदीवर महाबळेश्वर व अर्जुनवाड येथे स्वयंचलित पर्जन्यमापके बसविण्यात आली आहेत. त्यामुळे या ठिकाणाहून उपग्रहाद्वारे पुणे, हैदराबाद व दिल्ली येथील वरिष्ठांना तत्काळ पावसाची तीव्रता लक्षात येऊ शकते. याशिवाय कराड, वारंजी, नांद्रे, समडोळी, तेरवाड, सदलगा या ठिकाणीही पर्जन्यमापके बसविण्यात आली आहेत.
कृष्णा नदीला मिळणाऱ्या उपनद्यांवरही त्या-त्या नद्यांचा विसर्ग किती याचेही मोजमाप ठिकठिकाणच्या केंद्रावरून करण्यात येते. कोयना धरण व अलमट्टी धरण यांमधील पर्जन्यमान व होणारा विसर्ग याचे प्रामुख्याने होणारे मोजमाप कर्नाटक व महाराष्ट्र यांच्या सीमेलगत असणाऱ्या अर्जुनवाड व कुरुंदवाड या केंद्रांवरून मोठ्या प्रमाणात असतो. या केंद्राच्या विसर्गावरच कर्नाटकात महापुराची तीव्रता किती होऊ शकतो, याचा अंदाज बांधला जातो.
त्यामुळे या दोन केंद्रांना अतिमहत्त्वाची केंद्रे म्हणून दर्जा देण्यात आला आहे. सध्या या खात्याची सर्वच केंद्रे सक्रिय झाली असून, १ जूनपासून रात्रंदिवस प्रत्येक तासाला पाणीपातळीचे मोजमाप सुरू असून वरिष्ठांना कळविण्यात येत आहे.