संदीप आडनाईककोल्हापूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे सापडणाऱ्या "कॅलिओफिस कॅस्टो" या अत्यंत दुर्मिळ सापाची दुसरी नोंद कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावड्यातून करण्यात आली आहे. गगनबावडा येथील शिवाजी विद्यापीठाचे निसर्ग अभ्यासक सचिन कांबळे यांच्या या नव्या संशोधनामुळे या जिल्ह्य़ातील या सापाच्या अधिवासात भर पडली असून, सरीसृप तज्ज्ञ डॉ. वरद गिरी यांनी या सापाची ओळख पटवली. सापाच्या या अधिवासामुळे पश्चिम घाटातील गगनबावड्याचीही समृद्ध जैवविविधता ठळक झाली आहे.बंगलोरमधील वन्यजीव अभ्यासक प्रवीण एच. एन. आणि शिवाजी विद्यापीठात प्राणीशास्त्राचा विद्यार्थी सचिन कांबळे (गगनबावडा) यांनी ही नोंद केली. "हमदर्याद" या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामधे ही नोंद प्रसिद्ध झाली आहे. यापूर्वी ही नोंद सरीसृपतज्ज्ञ डॉ. वरद गिरी आणि सहकाऱ्यांसोबत २०१३ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथून केली होती.कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा येथील सांगशी येथे २८ जून २०२० रोजी सचिन कांबळे यांना हा सर्प जमिनीखाली आढळला. यापूर्वी या सापाची पाहिली नोंद आजऱ्यातून मयूर जाधव आणि सहकाऱ्यांनी केली होती. सरीसृप तज्ज्ञ डॉ वरद गिरी यांनी हा सर्प "कॅलिओफिस कॅस्टो" प्रजातीमधील असल्याचे स्पष्ट केले. त्याला रुजबेह गझदार आणि अनुज शिंदे यांनी दुजोरा दिला आहे.
१५ पैकी पाच प्रजाती भारतात
"कॅलिओफिस कॅस्टो" या वंशामध्ये सध्या १५ मान्यताप्राप्त प्रजाती आहेत. त्यापैकी भारतात पाच प्रजाती आढळतात. यापूर्वी २००० मध्ये पहिली नोंद झाली होती. क्वचितच दिसणारे, हे भारतातील काही सर्वात कमी ज्ञात असलेले साप आहेत. पश्चिम घाटातून याची नोंद आंबोली (महाराष्ट्र), कारवार (कर्नाटक) आणि डिचोली-बिचोलीम (दक्षिण गोवा) या वेगवेगळ्या भागातील तीन नमुन्यांच्या आधारे झाली होती. त्यानंतर अलीकडे या प्रजातीची नोंद कोटिगाव वन्यजीव अभयारण्य (गोवा-२०२१) आणि मडिलगे आणि होनेवाडी (महाराष्ट्र-२०२१) येथून नोंदवली गेली आहे.
एकरंग नसलेला, सडपातळ शरीर, डोक्यावर नारिंगी पट्टी आणि शेपटीच्या खालच्या बाजूने एकसमान केशरी रंगाच्या आधारे याला कॅलिओफिस कॅस्टो म्हणून ओळखले गेले. याची एकूण लांबी ८० सेमी होती. घरच्या बागेत खड्डा खोदताना दोन फूट खाली मोकळ्या मातीत हा साप आढळला. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो आपली शेपूट गुंडळून घेतो. - वरद गिरी, सरिसृप तज्ज्ञ.