कोल्हापूर : मराठमोळ्या घरंदाज व ग्रामीण बाज असलेल्या अभिनयाने मराठी चित्रपट सृष्टीत ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शांता माधव तांबे (वय ९०) यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. पंचगंगा स्मशनाभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या बुधवारी आहे.वृद्धापकाळातील व्याधींमुळे गेली काही महिने त्यांना सावली केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. अखेर सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. कधी खाष्ट ग्रामीण स्त्री, पाटलीण तर कधी घरंदाज स्त्री, मायाळू आई, सासू अशा अनेक भूमिका त्यांनी निभावल्या. सहजसुंदर अभिनय आणि साधेपणामुळे त्या प्रेक्षकांना आपल्यातल्याच एक वाटायच्या. शांत, मायाळू स्वभावाच्या शांता तांबे या स्वत:ला भूमिकेत झोकून द्यायच्या. त्यांची दिवंगत अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांच्यासोबतची चहाची जाहिरात व प्रेमा तुझा रंग कसा या नाटकातील भूमिका गाजली होती.शांता तांबे या मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शीच्या. वडिलांच्या हॉटेलात नाटक मंडळीतील लोक येत असल्याने त्यांना या क्षेत्राची माहिती होती. त्या १५ वर्षांच्या असताना वडील वारले, घरची आर्थिक परिस्थिती बेताची झाल्याने आईने लग्न लावून द्यायचा निर्णय घेतला, पण अनोळखी व्यक्तींशी लग्न करणार नाही असे सांगून त्यांनी नात्यातील स्थळ शोधायला सांगितले. अखेर मामाशीच त्यांचा विवाह झाला.चरितार्थासाठी हे कुटुंब कोल्हापूरला आले. कोल्हापुरात त्या राम गल्लीत राहायच्या. नाटक मंडळीतील लोकांशी असलेल्या ओळखीने त्यांना नाटकात काम मिळाले. सुरुवातीला देशबंधू संगीत मंडळीत तसेच वेगवेगळ्या नाटकांमध्ये मॉबमध्ये काम केले. पुढे मराठी चित्रपटात लहानमोठ्या भूमिका करत त्यांनी आपला ठसा उमटवला. मानिनी चित्रपटातील भूमिकेने त्यांना ओळख दिली.त्यांनी भालजी पेंढारकर, दिनकर पाटील, अनंत माने यांच्या दिग्दर्शनाखाली काम केले. मोहित्यांची मंजुळा, सवाल माझा ऐका, सुगंधी कट्टा, आई पाहिजे, असला नवरा नको गं बाई, सोंगाड्या, चांडाळ चौकडी, दोन बायका फजिती ऐका, मुंबईचा फौजदार, प्रतिकार, निर्मला मच्छिंद्र कांबळे, एक गाव बारा भानगडी, मर्दानी, आई पाहिजे हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते.अलीकडे ‘तुझ्यात जीव गुंतला’ या मराठी मालिकेतही त्यांनी भूमिका केली होती. ‘सवाल माझा ऐका’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. काही काळ त्यांनी पती माधव यांच्यासाेबत मंगल कलामंदिर ही नाट्य संस्थादेखील चालवली.
ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचे निधन, ९० व्या वर्षी कोल्हापुरात घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 11:49 AM